ओटीपी प्रकरणात पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनीअरला अटक
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओटीपी प्रकरणात एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला अटक करण्यात आली आहे. हा संबंधित तरुण पुण्यात एका नामांकित आयटी कंपनीत कामाला होता.

पुणे : पाकिस्तानी गुप्तहेर संघटनांच्या हस्तकांना ओटीपी (वन टाइम पासवर्ड) शेअर केल्याच्या घोटाळ्यात कथित सहभागाबद्दल ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) पुण्यातून एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला अटक केली आहे. अभिजित संजय जांबुरे असं संशयित तरुणाचं नाव आहे. तो मूळचा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आहे. तो पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत कामाला होता. त्याला स्थानिक न्यायालयात हजर करून भुवनेश्वरला नेण्यात आले. जांबुरे गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातून सांख्यिकी विषयातील पदवीधर आहे. तो दोन पाकिस्तानच्या लष्करी गुप्तहेर संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या २०१८ पासून संपर्कात होता. सिमकार्डद्वारे तयार केलेले ओटीपी सायबर गुन्हेगारांना त्याने विकल्याचा संशय आहे. पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांना त्याने फेसबुक मेसेंजरद्वारे ओटीपी शेअर केले; तसेच तो व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानी आणि नायजेरियन नागरिकांच्या संपर्कात असल्याचे ‘एसटीएफ’ने पत्रकात म्हटले आहे. पुणे न्यायालयातून तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला ओडिशामधील भुवनेश्वर येथे नेण्यात आले आहे. ‘एसटीएफ’ने या प्रकरणात यापूर्वी चार जणांना अटक केली आहे.
ओटीपी शेअर घोटाळ्यातील आरोपी एखाद्या व्यक्तीच्या नावावर ॲक्टिव्हेट न झालेले सिमकार्ड घेत असत. त्याद्वारे ओटीपी तयार करून डिजिटल वॉलेटला एक हजार ते ३० हजार रुपयांना विकत होते. अशा प्रकारे सायबर गुन्हेगारांना हजारो ओटीपी शेअर केल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
अभिजित अनेक दिवसांपासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात होता. त्याचा फेसबुक मेसेंजरद्वारे पाकिस्तानातील फैसलाबाद खानकी येथील दानिश अलिस सय्यद दानिस अली नक्वी याच्यासोबत संपर्क आला होता. दानिशने अभिजितला आपण एका अमेरिकन आयटी कंपनीत फ्रिलान्सर म्हणून काम करत असल्याचे सांगितले. अभिजितने त्याचा आयडी आणि पासवर्ड दानिशला दिला होता. अभिजितच्या सल्ल्यानुसार दानिश या कंपनीत काम करीत होता. त्याचे सर्व पैसे अभिजितच्या भारतातील खात्यात जमा होत होते.