वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य,जनतेच्या न्यायालयात जिंकलो, आता न्यायदेवतेकडून अपेक्षा

आता आमदारांच्या अपात्रतेवर ‘तारीख पे तारीख’ करण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी प्रार्थना वा अपेक्षा आपण सर्वोच्च न्यायालयाला करीत आहोत, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात मांडली.मोदी सरकार लवकर पडून मध्यावधी निवडणुका व्हाव्यात, असेही मत त्यांनी मांडले. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्वभूमीवर भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.लोकशाही संपविण्याचा विडा उचलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाने वेळीच आवर घालावा, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली. आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय होईपर्यंत विधान परिषदेच्या ११ जागांसाठी जाहीर झालेली निवडणूक होऊ नये, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.देशाची लोकशाही, संविधान वाचावे यासाठी अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी इंडिया आघाडीला मतदान करा, असा प्रचार केला. या संस्थांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शहरी नक्षलवादी’ म्हटले आहे. पण केंद्रीय व राज्याच्या यंत्रणांचा दुरुपयोग करून अटकेची भीती दाखवीत केलेला हा ‘सरकारी नक्षलवाद’ आहे, असे प्रत्युत्तर ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले. हुकूमशाही तोडा, फोडा आणि लोकशाही, संविधान वाचवा त्याला हे शहरी आतंकवाद ठरविणार असतील तर हो, मी आतंकवादी आहे अशी स्पष्टोक्ती ठाकरे यांनी दिली.लोकसभा निवडणुकीतील यशानंतर उद्धव ठाकरे भाजपबरोबर जाणार असा अपप्रचार केला जात आहे. पण आपल्या आईसमान शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपबरोबर कदापि जाणार नाही अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. आता भुजबळ शिवसेनेत जाणार अशी आवई उठवली गेली आहे. दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.आत्मविश्वास आणि अहंकार यात फरक आहे. आपल्यात आहे तो आत्मविश्वास आणि मोदी यांच्यात आहे तो अहंकार अशी टीका ठाकरे यांनी केली.आमच्या शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाहीं पण चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांना बरोबर भाजपने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेले आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. नायडू यांनी मुस्लिमांना विविध सवलती देण्याचा जाहीरनामा भाजप पूर्ण करणार आहे का, असा सवालही ठाकरे यांनी केला. माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सर्वत्र प्रचारात वापरून यशाचा दर (स्ट्राइक रेट) वाढल्याचा दावा केला जात आहे. विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो, शिवसेनेचे नाव, चिन्ह न वापरता मैदानात उतरून दाखवा मग कोणाचा स्ट्राइक रेट जास्त येईल ते बघा, असे आव्हानही ठाकरे यांनी शिंदे यांना दिले.