२८ लाखाचा मुद्देमाल जप्त,गुटख्याची अवैध वाहतूक .
शिरपूर (धुळे) : गुजरात, मध्यप्रदेशमधून गुटख्याची अवैध वाहतूक केली जात असते. पोलिसांकडून अनेकद कारवाई झाल्यानंतर देखील पुन्हा एकदा मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर सांगवी पोलिसांनी जप्त केला. या कारवाई पोलिसांनी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. धुळ्याच्या सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना सेंधव्याकडून शिरपूरकडे पानमसालायुक्त गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाईचे आदेश दिले. ४ मेस सायंकाळी पोलिसांच्या पथकाने पळासनेर गावाजवळ असलेल्या चेक पोस्टवर संशयित कंटेनर चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र त्याने गाडी न थांबविता सुसाट वेगाने निघाला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करत सोनगीर (ता. धुळे) गावाजवळ कंटेनर पकडला. यानंतर चालक शौकीन चांद (वय ३५) याला ताब्यात घेतले. चालकाला कंटेनरमधील मालाबाबत विचारणा केली असता त्याने पानमसालायुक्त गुटखा व इतर ट्रान्स्पोर्टचा माल असल्याची माहिती दिली. कंटेनर पोलिस ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यात पानमसाला व तंबाखू, जर्दा असा १३ लाख १५ हजार ५६ रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला. १५ लाख रुपये किमतीच्या कंटेनरसह एकूण २८ लाख १५ हजार ५६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.