मुख्यमंत्री शिंदे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल,“बाबासाहेब आंबेडकरांना यांनीच त्रास दिला”
डोंबिवली :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत तुम्ही राज्याच्या विकासाच्या योजनांना विरोध केला असे कडवे बोल सुनावले आहेत. तसंच खुर्चीसाठी अनैसर्गिक आघाडी झाली असा शाब्दिक वार देखील शिंदेंनी केला.या सभेत शिंदे यांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची आणि त्याच्या विचारधारेची आठवण करून दिली. बाबासाहेबांचे संविधान आजही आम्ही पाळत आहोत, असं शिंदेंनी सांगितलं.” जब तक सूरज चांद रहेगा, तब तक संविधान रहेगा” अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच काँग्रेसवर आरोप करत सांगितले की, ” काँग्रेसने बाबासाहेबांना कायमच त्रास दिला, काँग्रेसने त्यांचे आदेश पाळले नाहीत.”
महाविकास आघाडीच्या सरकारला आरोप करत शिंदे म्हणाले, “तुम्ही सरकार आले की हे बंद करू, ते बंद करू, पण सरकारची कामे सुरू ठेवायची होती. तुमच्याशी प्रतारणा केली. इथे खुर्ची साठी अनैसर्गिक आघाडी झाली.” यावर शिंदे यांनी महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांची निंदा केली आणि त्यांच्या सरकारच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली..शिंदे यांनी ‘अटल सेतू’, ‘नागपूर-मुंबई मेट्रो’ आणि अन्य प्रकल्पांची तुलना करत सांगितले की, महाविकास आघाडीच्या सरकारने काहीच प्रगती केली नाही. “तुम्ही मेट्रो बंद केली, मी ती चालू ठेवली. मोदींच्या शुभ हस्ते मेट्रोचा शुभारंभ झाला आणि आज त्यात 12 लाख प्रवासी प्रवास करतात. दुसऱ्या टप्प्यात 20 लाख प्रवासी प्रवास करतील,” असे त्यांनी म्हटले.
विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी राहुल गांधींच्या भाषणातील मुद्दे खोडून काढले. शिंदे म्हणाले की, “हे देणं बँक आहे, घेणं बँक नाही.” त्यांनी लाडक्या बहिणी योजनेवरून सरकारच्या निधी वितरणाची चर्चा केली आणि स्पष्ट केले की, “आम्ही स्वच्छ नियत असलेले सरकार आहोत. आम्ही ऑक्टोबरमध्येच नव्हे, तर नोव्हेंबरमध्येही हप्ता दिला.”शिंदे यांचे वक्तव्य हे राज्यातील आगामी राजकीय वातावरणावर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. त्यांच्या आरोपांनी आणि विकासाच्या मुद्द्यांवर भर दिल्यामुळे, शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर घेतले. कल्याण ग्रामीण मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांच्यासाठी जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर प्रहार केले.