शरीराचे तुकडे करून जैन मुनीची हत्त्या पोलिसांच्या हाती लागली डायरी
दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी १० ते १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत त्यांची चौकशी झाली आहे.

चिक्कोडी : हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाचे जैनमुनी कामकुमार महाराज (Kamkumar Nandi Maharaj) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे
स्वामींची डायरी पोलिसांच्या हाती लागली असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.
त्यामुळे या प्रकरणात आणखी काहीजणांची चौकशी होण्याची शक्यताही वर्तवली आहे. माहिती अशी, जैन मुनींची हत्या केलेल्या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी १० ते १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत त्यांची चौकशी झाली आहे. पहिल्यांदा त्यांनी स्वामींची डायरी जाळून टाकल्याचे म्हटले होते.त्याची राख पोलिसांनी बंगळूरला तपासासाठी पाठविली होती. ती राख डायरीची नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यावर पोलिसांनी पुन्हा चौकशी करून डायरी शोधून काढून ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या डायरीत स्वामींच्या आर्थिक विषयांवर प्रकाश पडणार असल्याने त्यात नावे असलेल्यांची चौकशी पोलिस करण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा संशयित मारेकऱ्यांनी ही डायरी जाळल्याचे म्हटले होते.त्यांनी त्याप्रमाणे पोलिसांना का सांगितले होते? याबाबतही पोलिस चौकशी करणार आहेत. पोलिसांनी घटनास्थळासह अनेक ठिकाणी मारेकऱ्यांना फिरवून पुरावे गोळा करण्याचे काम केले आहे. आता संशयित मारेकऱ्यांना न्यायालयीन कोठडी आहे. त्यामुळे अधिक चौकशी करून लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी तपास चालविला आहे.