maharastra

परदेशातही शिवजयंती, किल्ले प्रतापगडावरून थेट जपानपर्यंत शिवज्योत

भारत कल्चरल सोसायटी जपानने प्रतापगडावर विधिवत पूजा करून ही मशाल जपानला नेण्याचे नियोजन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आदरांजली वाहण्यासाठी भारत कल्चरल सोसायटी बीसीएस जपानने एक अनोखी संकल्पना साकारली आहे. महाबळेश्वरच्या किल्ले प्रतापगडावर विधिवत पूजन केलेली शिवज्योत यंदा थेट जपानच्या भूमीत पोहोचणार आहे. तब्बल 70 वर्षांनंतर प्रथमच जपानमध्ये शिवजयंती साजरी झाल्यानंतर यंदाही शिवजयंती उत्सवात पालखीतून महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक, लेझीम, ढोल-ताशा, फेट्यांचा थाट, शिवचरित्रावर आधारित भव्य महानाट्य सादर करण्यात येणार आहे.गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील जपानमधील शिवजयंतीचे वैशिष्ट्य ठरणार आहे. प्रतापगडावरून जपानला नेली जाणारी शिव ज्योत. महाराष्ट्रात जशी शिवजयंती गडांवरून मशालीच्या प्रकाशात साजरी केली जाते, तीच परंपरा पाळत भारत कल्चरल सोसायटी जपानने प्रतापगडावर विधिवत पूजा करून ही मशाल जपानला नेण्याचे नियोजन केले आहे. यासाठी संस्थेचे कार्यकर्ते अनिकेत पाटील यांच्या सोबत बळवंत पाटील, महेश मोरे आणि स्थानिक सदस्यांनी प्रतापगडला भेट दिली. यावेळी क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा गिरगाव, कोल्हापूरचे वस्‍ताद प्रमोद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक करून विशेष सहकार्य केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी पराक्रमाचा उजाळा देण्यासाठी आणि त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जपानमधील हा शिवजयंती सोहळा एक प्रेरणादायक ठरेल.जपानमधील या ऐतिहासिक शिवजयंती उत्सवाला भारताचे जपानमधील राजदूत सिबी जॉर्ज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर टोकियोमधील स्थानिक महापौर, जपानमधील विविध भारतीय व जपानी संस्थांचे प्रतिनिधी, तसेच सुमारे दोनशेहून अधिक जपानी नागरिक या कार्यक्रमाला महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहतील.भारत कल्चरल सोसायट बीसीएस जपान ही जपानमधील एक सेवाभावी संस्था असून, ती विविध उपक्रमांद्वारे भारतीय आणि जपानी संस्कृतींमध्ये सेतू बांधण्याचे काम करते. रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहिमा आणि सामाजिक गरजांसाठी स्वयंसेवक पुरवणे ही त्यांची काही वैशिष्ट्यपूर्ण कामे आहेत.सुमारे शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी मेहनत व तितक्याच स्थानिक कलाकारांच्या योगदानातून शिवचरित्र महानाट्याच्या माध्यमातून शिवरायांचा पराक्रम आणि इतिहास साकारला जाणार आहे. त्यामुळे या वर्षीचा शिवजयंती महोत्सव अधिक भव्यदिव्य साजरा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button