गुन्हेगारी

महादेव बुक बेटींग ॲपप्रकरणात बुधवारी देशभरात सीबीआयचे ६० ठिकाणी छापे

मुंबई :  केंद्रीय अन्वेषण विभागाने देश भरात विविध ठिकाणी छापे मारले असता  या छाप्याचा संबंध महादेव बुक बेटिंग ॲपशी आहे. या सट्टेबाजी ॲपचे प्रवर्तक रवी उप्पल आणि सौरभ चंद्राकर सध्या दुबईत आहेत. याप्रकरणी सुरूवातीला रायपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने ईओडब्ल्यू गुन्हा नोंदवला होता, परंतु नंतर छत्तीसगड सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केले. त्यानंतर आता सीबीआय वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि इतर आरोपींच्या भूमिकेची सखोल चौकशी करीत आहे. छाप्यादरम्यान अनेक भक्कम डिजिटल आणि दस्तऐवजी पुरावे सापडले आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ते जप्त केले असून हे छापे सध्या सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता आणि दिल्लीतील ठिकाणांचा समावेश असून ही ठिकाणे राजकारणी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, महादेव बुकचा प्रमुख हस्तक, तसेच या प्रकरणात सामील असलेल्या खासगी व्यक्तींशी संबंधित आहेत. देशभरात सट्टेबाजीच्या ॲपचे जाळे विणणारे रवी उप्पल व सौरभ चंद्राकर हे विनाअडथळा अवैध सट्टेबाजीचे नेटवर्क चालविता यावे यासाठी राजकारणी व अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाच देत असल्याच्या संशयावरून सीबीआयने ही कारवाई केली.

भारतातील ऑनलाईन बेटिंग ॲप युएईमधून चालवण्यात येत असून त्याची संगणकीय यंत्रणा, संकेतस्थळाची यंत्रणा नेदरलँडमध्ये आहे. ॲपचा प्रचार करण्यासाठी नेपाळ, यूएई व श्रीलंका येथून कॉल सेंटर चालवण्यात येत असल्याचा ईडीला संशय आहे. व्हॉट्स ॲपद्वारे या ॲपची जाहिरात केली जाते. त्याला प्रतिसाद दिल्यानंतर ती माहिती कॉल सेंटरपर्यंत पोहोचते. तेथून सर्व माहिती दिल्यावर संबंधित व्यक्तीचे आभासी खाते उघडण्यात येते. त्यानंतर त्यात रक्कम भरून ॲपद्वारे बेटिंग केले जाते. या सर्व यंत्रणेसाठी देशभरात चार ते पाच हजार पॅनल ऑपरेटर कार्यरत आहेत. त्यापैकी सर्वाधिक ऑपरेटर छत्तीसगड, मुंबई आणि दिल्ली येथे आहेत.प्रत्येक ऑपरेटर किमान २०० ग्राहक सांभाळतो. बेटींगमधील कमाई हवालामार्फत परदेशात पाठवून तेथील खात्यांमध्ये जमा केली जाते. त्यामुळे मुख्य आरोपींपर्यंत पोहोचणे कठीण होते. या सर्व व्यवहारातील ३० टक्के रक्कम ऑपरेटरला मिळते. उर्वरित रक्कम पुढे पाठवली जाते. आठवड्यातील सर्व व्यवहार प्रत्येक सोमवारी बंद केले जातात. या ॲपद्वारे दररोज सुमारे २०० कोटी रुपयांचा फायदा मिळत असल्याचा अंदाज आहे. महादेव अपचे प्रवर्तक सुमारे ४ ते ५ ॲप चालवत असल्याचा संशय आहे. या टोळीचे बेटिंग ॲप पाकिस्तानातही सुरू असल्याची माहिती ईडीच्या हाती लागली होती. महादेव ऑनलाईन बुकचा प्रवर्तक रेड्डी अण्णा फेअर प्ले इत्यादीसारख्या अनेक ऑनलाइन सट्टेबाजी ॲपमध्येही भागीदार अथवा प्रवर्तक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button