धुळ्याहून सुरतला वाहतूक, बसमध्ये ठेवलेल्या गोण्यांवर संशय; तपासात पोलिसही चक्रावले
धुळ्यातील बसस्थानकात तस्करीचं मोठं प्रकरण समोर आलं. याप्रकरणी धुळे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. बसमध्ये ठेवलेल्या गोण्यांवर संशय आला आणि मोठं प्रकरण उघड झालं आहे.
: अमळनेर – बडोदा बस वाहक आणि धुळे आगार व्यवस्थापकाच्या सर्तकतेमुळे तस्करीचं मोठं प्रकरण समोर आलं आहे. धुळे शहर पोलिसांनी तत्परता दाखवत बसमधून एकाला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून तब्बल ७०० देशी दारुच्या बाटल्या शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दारूच्या बाटल्या तांदळाच्या साळमध्ये लपवून आणल्या जात होत्या. सुरत येथील प्रवीण पाटील नावाचा व्यक्ती अमळनेरहून सुरतला या दारूच्या बाटल्या घेऊन जात होता. बस वाहकाला या बसमध्ये ठेवलेल्या गोण्यांवर संशय आल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला आहे.धुळे मध्यवर्ती बसस्थानकात गुरुवारी दुपारच्या सुमारास अमळनेर – बडोदा बसवरील (क्रं. एमच-२० बीएल २५३४) बसमधील एक प्रवासी त्याच्यासोबत ४ गोण्यांमध्ये काहीतरी संशयास्पद स्थितीत सुरतला घेऊन जात असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर वाहकाने ही माहिती आपल्या आगार व्यवस्थापकांना सांगितली. त्यांनी तत्काळ ही बस धुळे बस डेपोत घेऊन जात तिथल्या अधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला.त्यांनी लगेच बस स्थानकात ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार ज्ञानेश्वर साळुंके आणि पोलिस नाईक वैभव वाडीले यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी घटनेची माहिती धुळे शहर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना दिली. कोकरे यांनी तत्काळ शोध पथकातील लोकांना धुळे बस डेपोत पाठवून सदर दारू घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.