हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर, मुंबईत पावसाचा रेड अलर्ट;
मुंबई पोलिसांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
गुरुवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसाचा फटका वाहतूक सेवेलाही बसला होता. दरम्यान, हवामान विभागाने आजही मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सुचना मुंबई पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.मुंबईत पोलिसांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती आहे. हवामान विभागाने मुंबईत शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंत पावसाचा रेड अलर्ट जारी केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी शक्यतोवर घराबाहेर पडू नये, काही महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तसेच नागरिकांना आपात्कालीन परिस्थिती काही मदत हवी असल्यास १०० किंवा ११२ या क्रमांकवर फोन करावा, असेही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.दरम्यान, मुंबईत बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी पहाटे जोर धरला होता. त्यामुळे मुंबईकरांची त्रेधा उडाली. मुंबईसह उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचले. अनेक नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. नदी आणि पुलावरून पाणी वाहू लागल्याने, रस्ते मार्ग ठप्प झाले होते. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली होती. याचा परिणाम लोकल सेवेवरही झाला होता. मोटरमनला लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अनेक लोकल एका मागे एक संथगतीने चालत होत्या. विस्कळीत झालेल्या लोकल सेवेमुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब झाला. गुरुवारी संपूर्ण दिवसभरात १५० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द झाल्या होत्या.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कर्जतमध्ये २३३, पनवेलमद्ये १२५.५, मुंबई विमानतळ १०३, चेंबूरमध्ये ९४.०, सायनमध्ये ८९.७, माटुंग्यामध्ये ८७.०, सांताक्रूझमध्ये ८५.० तर मुंबई उपनगरात ७०.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.