Blog: ‘The Kerala Story’ चित्रपटाचा असाही परिणाम; मुंबई ते डोंबिवली लोकल प्रवासादरम्यान आलेला सुन्न करणारा अनुभव
द केरला स्टोरी’मुळे छोट्याछोट्या गोष्टींतून लोकांच्या मनामधील धार्मिक द्वेष जाणवायला हा एक अनुभवच पुरेसा आहे
Blog : एखादा चित्रपट जेव्हा राजकीय वळण घेतो तेव्हा त्या कलाकृतीचं एका आंदोलनात रूपांतर होतं, हे आपण गेल्या काही वर्षांत पाहिलं आहे. याआधीसुद्धा असे प्रकार होत होते, पण विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’मुळे राष्ट्रवादावर आधारित अशा चित्रपटांचा जो एक ट्रेंड सुरू झाला आहे तो दिवसेंदिवस भयानक वळण घेत आहे. कोणता चित्रपट प्रोपगंडा नसतो? याचं उत्तर चटकन आपण कुणीच देऊ शकणार नाही, कारण प्रत्येक चित्रपटाच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शक काहीतरी सांगू पाहत असतो, त्यामुळे अमुक एक चित्रपटच प्रचारकी आणि बाकीचे नाहीत हे आधी आपण डोक्यातून काढलं पाहिजे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रचारकी जरी असला तरी तो अत्यंत उत्तम रिसर्च केलेला, तथ्यांच्या आधारावर एक बोल्ड स्टेटमेंट करणारा चित्रपट होता हे अगदी कुणीही मान्य करेल.
नुकताच आलेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट मात्र ‘द कश्मीर फाइल्स’ने निर्माण केलेल्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन राजकीय तसेच धार्मिक मतभेद निर्माण करणारा, त्यांना प्रोत्साहन देणारा आणि समाजात एक तेढ निर्माण करणारा चित्रपट आहे हे मी अगदी ‘डंके की चोटपर’ सांगू शकतो. नुकताच मुंबई ते डोंबिवली लोकलने प्रवास करताना आलेला एक अनुभव हा चित्रपट सामान्य लोकांच्या मनावर किती खोलवर परिणाम करतो हे मला सांगून गेला. तसं पाहायला गेलं तर ही फार किरकोळ गोष्ट आहे, पण ‘द केरला स्टोरी’मुळे याच छोट्याछोट्या गोष्टींतून लोकांच्या मनामधील धार्मिक द्वेष जाणवायला हा एक अनुभवच माझ्यासाठी पुरेसा आहे. धर्म, जात वगैरे सगळं सोडा पण हा प्रसंग अनुभवल्यानंतर आपण माणूस म्हणून कोणत्या दिशेने वाटचाल करतोय याची प्रकर्षाने जाणीव झाली.