ईडी चौकशीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; कार्यकर्त्यांनाही केल्या महत्त्वाच्या सूचना
दक्ष पोलिस न्यूज (मुंबई) : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली होती. जयंत पाटील आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर होणार आहेत. दुसरीकडे जयंत पाटील यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यभरात राष्ट्रवादीच्या वतीने ईडीचा निषेध करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. ईडी कार्यालयात रवाना होण्यापूर्वी जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे.
ईडी कार्यालयात हजर होण्यापूर्वी जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, मी ईडीच्या चौकशीला घाबरत नाही. तपास यंत्रणेला चौकशीमध्ये सहकार्य करू. मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांनी शातंता पाळावी. मी कोणतीही कागदपत्रे घेऊन जात नाहीये. कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान जयंत पाटील यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू आहे. ईडीचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. ईडी कार्यालयाच्या परिसरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.