महाविकास आघाडीचे सरकार आले, तर आम्ही जेलमध्ये असू , नितेश राणे
आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत एकत्र आले होते. यावेळी नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांनी विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीत चुकून महाविकास आघाडीचे सरकार आले, तर आम्ही जेलमध्ये असू, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे.सरकार आले तर आम्हाला हे लोक बाहेर ठेवणार नाही. मला तर पहिल्या १०० दिवसातच आतमध्ये टाकतील. चुकून मविआचे सरकार आले तर आम्ही जेलमध्ये असू , आम्ही ६ महिन्यातच कोल्हापूरच्या जेलमध्ये गोट्या खेळत असू, असं नितेश राणे म्हणाले. तसेच मी बॅग भरून ठेवली आहे, पण मी पुन्हा भाजपला निवडून आणण्याचा निर्धार करुन बाहेर पडलोय, असं नितेश राणे यावेळी म्हणाले.
शरद पवार यांच्या पक्षात जे प्रवेश करत आहेत त्यांची तर आता कीव वाटतेय. कारण 2024ची निवडणूक ही शरद पवारांच्या पक्षाची शेवटची निवडणूक आहे. 2029 ला शरद पवारांचा पक्षच राहणार नाही, मग आज पवारांच्या पक्षात जात असलेले 2029 नंतर मग कोणत्या पक्षात जाणार?, याचा त्या लोकांनी आधी विचार करावा, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे. जातीय तेढ, जातीयवाद यापासून महाराष्ट्रला वाचवण्याची वेळ आलीय. कोलांट्याउड्या घेण्यामध्ये सुवर्णपदक द्यायची जर वेळ आली तर यासाठी जगात एकमेव नाव शरद पवारांचे आहे. कारण पवारांनी इतक्या कोलांट्यउड्या त्यांच्या राजकारणामध्ये आतापर्यंत घेतल्या आहेत असेही गोपीचंद पडळकर म्हणाले. महाविकास आघाडीमधील जो-तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडतायत. पण देवेंद्र फडणवीसांची आज वेळ खराब असेल, नशीब नाही. जरा वेळ जाऊ द्या…ऊठसूट ज्या भानगडी सुरु आहेत, त्या बंद होतील असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा या भागातील टँकरचे मोर्चे संपले, चारा छावणीची मागणी संपली. कारण केंद्रातून आणि राज्यातून एका वेळी 50 हजार कोटी महाराष्ट्रच्या योजनाना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मिळवून दिले असे पडळकर म्हणालेत. तसेच महायुती सरकार विविध योजना आणत असतांना कॉंग्रेस लाडकी बहीण योजना बंद करा म्हणतेय. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखलीची वाळू सरकली आहे, असा निशाणा देखील गोपीचंद पडळकर यांनी साधला.