ग्राहक न मिळाल्याने आंब्याच्या दरात घसरण; हापूसही आला आवाक्यात
: मुलांना सुट्ट्या असल्याने आणि शाळा सुरू होण्यास वीस दिवसांचा अवधी असल्याने, अनेक लोक आता बाहेरगावी गेले असल्याने बाजारात खरेदीसाठी ग्राहकच नाही. त्यामुळे आंब्याच्या दरात घसरण झाली आहे.
मुंबई : मे महिन्याचा अखेरचा हंगाम सुरू असून बाजारात आता सर्व ठिकाणांहून आंब्यांची चांगली आवक होत आहे. कोकणातून आणि इतर ठिकाणांहूनही बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल होत आहे. मात्र तरीही आंब्यांना बाजारात उठाव मिळताना दिसत नाही. मुलांना सुट्ट्या असल्याने आणि शाळा सुरू होण्यास वीस दिवसांचा अवधी असल्याने, अनेक लोक आता बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी ग्राहकच नाही. उठावच नसल्याने, सर्वच प्रकारच्या आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. किमती आवाक्यात आल्याने, आता सर्वांना आंब्याची चव चाखता येणार आहे.एप्रिल आणि मे महिना हा आंब्यांचा मुख्य हंगाम असतो. या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे येतात, त्यांचे दरही उतरलेले असतात. त्यामुळे सर्वांना त्याची चव चाखता येते. मात्र यावर्षी अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे सर्व गणित बिघडले. एप्रिलमध्ये फारच कमी प्रमाणात आंबा बाजारात आला. १५ मेपर्यंत बाजारात कोकणातील आंब्यांची आवक अगदी कमी होती. राज्यातील इतर ठिकाणांहून येणारा आंबाही कमीच होता. त्यामुळे ऐन हंगामात बाजारात आंबा उपलब्ध होत नव्हता. जो काही माल येत होता, त्याचे दर चढे असल्याने, सर्वसामान्य लोक खरेदीसाठी पुढे येत नव्हते. आता १५ मेपासून थोड्या प्रमाणात आंब्याची आवक वाढायला सुरुवात झाली आहे. आता महाराष्ट्रातील आंब्याचा हंगाम आटोपत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात येत आहे, त्याचे दरही कमी झाले आहेत. आवक जास्त आहे, मात्र हवा तसा उठाव नाही. त्यामुळे लोकांनी आता आंब्यांचा हवा तितका आस्वाद घ्यावा.
कोकणातून आता आंब्याच्या ३० ते ३५ हजार पेट्या दररोज बाजारात येत आहेत. इतर ठिकाणांहून ३५ ते ३८ हजार पेट्या तसेच खुल्या स्वरूपातही मोठ्या प्रमाणात आंबा येत आहे. महाराष्ट्राच्या इतर भागातील आंब्याचाही हा शेवटचा बहर आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात दाखल होत आहे आणि त्याचे दरही खूप खाली झाले आहेत. कोकणातील हापूस आंबा आता ३०० रुपये डझनापर्यंत उतरला आहे, तर कर्नाटकी आंबे ८० ते १०० रुपये किलोवर आले आहेत.
दर आवाक्यात
सध्या देवगडमधील आंब्याची आवक कमी झाली आहे. आता मुरुड-जंजिरा, अलिबाग, बाणकोट, रत्नागिरीचा आंबा बाजारात येत आहे. तोही जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. त्यामुळे आता दर कमी झालेले असताना आणि आवक वाढलेली असतानाच खवय्यांनी आंबा खाऊन घ्यावा, असे आवाहन व्यापारी करत आहेत.