चोराचा विमान प्रवास, २० लाखांच्या दागिन्यांची चोरी; मुंबईतील घटनेने पोलीस अवाक्

मुंबई : मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू भागातून चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मलबार हिल पोलिसांनी गुड्डू महतो(वय २७) याला २० लाखांच्या सोनेचोरी प्रकरणात अटक केली आहे. आरोपी गुड्डू हा मुंबईतील एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरकडे कुक म्हणून काम करत होता. या डिझायनरच्या घरातून चोरी केलेले सोन्याचे दागिने विकून गुड्डूने बिहारमधील आपल्या घराचे रिनोवेशन केले होते. मलबार हिल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुड्डू महतो हा मागील दहा वर्षांपासून या फॅशन डिझायनरकडे काम करत होता. यादरम्यान, महतोचे लग्न जमले. लग्न जमल्याने त्याला बिहारमधील घराचे काम करायचे होते. मात्र, पैसे नसल्याने त्याच्या घराचे काम रखडले होते. या डिझायनरकडे महतो बऱ्याच वर्षांपासून काम करत असल्याने त्याला घरातील दागिन्यांची माहिती होती. यावेळी महतोची नियत फिरली आणि त्याने या डिझायनरच्या घरातून थोडे थोडे सोन्याचे दागिने चोरायला सुरवात केली. तसेच फेब्रुवारी महिन्यात त्याने हे काम सोडले. महतोने काम सोडल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात घरातील काही दागिने गायब असल्याचे डिझायनरच्या लक्षात आले. यानंतर त्याने मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मुंबईतील काम सोडल्यानंतर आरोपी आपल्या बिहारमधल्या गावी निघून गेला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून १७ लाख रुपये जप्त करण्यात आले. तसेच चौकशीत या चोराने मुंबईवरून बिहारला जाण्यासाठी अनेकवेळा विमान प्रवास केल्याचे देखील समोर आले आहे.