धारावीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खाकी वर्दीतील समाजसेवक कांदळगावकर सेवानिवृत्त
दक्ष पोलिस न्यूज प्रतिनिधी (मुंबई) : धारावी पोलीस ठाण्याचे बहुचर्चित वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले तेव्हा पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसी ब्रीदवाक्याला जागणारा, सर्वांच्या मदतीला धावणारा खाकी वर्दीतील खरा समाजसेवक अशी कांदळगावकर यांची जनमानसात प्रतिमा होती. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अलीकडेच धारावी पोलीस ठाण्याला भेट देऊन कांदळगावकर यांच्या कामाचे काwतुक केले होते. असा हा धडाकेबाज अधिकारी बुधवारी सेवानिवृत्त झाला. पोलीस शिपाई ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदापर्यंत पोहोचलेल्या या अधिकाऱयाचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून पहिलेच पोलीस ठाणे होते. धारावीसारख्या संवेदनाक्षम परिसरात कांदळगावकर यांनी जातीय सलोखा राखण्यासाठी, गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कौतुकास्पद कामगिरी केली होती. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी कायम त्यांच्या कामावर समाधानी असायचे.
मुंबईत अंडरवर्ल्डने डोके वर काढल्यानंतर, गँगवॉर वाढल्यानंतर कांदळगावकर यांनी मुंबई क्राइम ब्रँचमध्येही देदीप्यमान कामगिरी केली होती. चकमकीत भाग घेऊन संघटित टोळय़ांतील गुंडांचा खात्मा केला होता. गुंतागुंतीच्या अनेक केसेसवर प्रकाश टाकला होता. पोलीस दलात एक नॉनकॉण्ट्रिव्हर्सल निःस्वार्थी प्रामाणिक अधिकारी अशी त्यांनी कायम प्रतिमा जपली होती. अशा या अधिकाऱ्याला बुधवारी धारावी पोलिसांनी सन्मानपूर्वक निरोप दिला तेव्हा अनेकांच्या डोळय़ात अश्रू दाटून आले होते.