ठाणे

कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याला सलाम; रिक्षात विसरलेल्या दीड लाखांच्या कॅमेरा फक्त ४ दिवसात लावला शोध

ठाणे : घाईगडबडीत रिक्षात विसरलेला दीड लाखांचा कॅमेरा ठाणे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याने कर्तव्यदक्षता दाखवत अवघ्या चार दिवसांत शोधून दिला. रिक्षाचा नंबर सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून शोधण्यासाठी या कर्मचाऱ्याने जंगजंग पछाडले. अखेर ज्या रिक्षात हा कॅमेरा होता. त्या रिक्षा चालकाला शोधून हा कॅमेरा संबंधित प्रवाशाच्या स्वाधीन करण्यात आला. खाकी वर्दीच्या या कार्यतत्परतेबाबत प्रवाशाने वाहतूक पोलिसांचे आभार मानले आहेत. मुंब्रा येथील रहिवासी कौसर शेख यांनी २ जून रोजी कौसा येथून मुंब्रा रेल्वे स्थानक येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. शेख रिक्षात त्यांचा दीड लाखांचा कॅमेरा विसरले. त्यांनी ही रिक्षा शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र रिक्षा न सापडल्याने ते हतबल झाले. अखेर त्यांनी कोपरी वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांना संपर्क केला. त्यांना कॅमेरा हरवल्याचे सांगितले. आतापर्यंत शेकडो नागरिकांच्या रिक्षात हरवलेल्या वस्तू शोधून देण्यात जाधव यांचा हातखंडा असल्याने त्यांनी तपासाची चक्रे फिरवली.

सीसीटीव्ही फूटेजमध्ये रिक्षा सापडली असता त्याचा रिक्षा क्रमांक शोधण्यासाठी त्यांनी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे संतोष समेळ यांची मदत घेतली. त्यानंतर रिक्षाचालक शोधून काढला. सुरवातीला चालकाने कॅमेरा रिक्षात नव्हताच, असे सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने शेख यांचा कॅमेरा आणून दिला. जाधव यांच्या या कर्तव्यदक्षतेबद्दल शेख यांनी सर्व वाहतूक पोलिसांचे आभार मानले. ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या हस्ते व कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या उपस्थितीत हा कॅमेरा शेख यांना सुपूर्द करण्यात आला.

अवघ्या काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाचा रिक्षात विसरलेला लॅपटॉप जाधव यांनी अशाच पद्धतीने शोधून दिला होता. आताही शेख यांचा कॅमेरा त्यांनी रिक्षा चालकाचा शोध घेऊन मिळवून दिला. आतापर्यंत रिक्षात विसरलेले एकूण ४८ मोबाइल, प्रत्येकी दोन लॅपटॉप व कॅमेरे आणि प्रवाशांचे महागडे कपडे, रोकड, कागदपत्रे जाधव यांनी हुडकून दिली आहेत. खाकी वर्दीच्या ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार काम करत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button