ठाणे

मुंबई,ठाणे जिल्ह्यात १०० गुन्हे केलेला ‘मोक्का’तील फरार इराणी गुंड अटकेत

मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांत घरफोड्या, लुटमार, दहशतीचा अवलंब करून कायदा सुव्यवस्था बिघडविणारा आंबिवली इराणी वस्तीमधील एका खतरनाक गुंडाला खडकपाडा पोलिसांनी अटक केली.

कल्याण –  मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांत घरफोड्या, लुटमार, दहशतीचा अवलंब करून कायदा सुव्यवस्था बिघडविणारा आंबिवली इराणी वस्तीमधील एका खतरनाक गुंडाला खडकपाडा पोलिसांनी कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यातील अलनवर गावातून  शिताफीने अटक केली. कासीम मुख्तार इराणी उर्फ तल्लफ (२४) असे गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर मुंबई, ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात १०० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. संघटित गुन्हेगारी कायद्याने कासीमवर कारवाई करण्यात आली आहे. ३० गुन्ह्यांमध्ये त्याला फरार म्हणून घोषित करण्यात आले होते. काही वर्षांपासून पोलीस त्याचा माग काढत होते.

लपून असला तरी कासीमच्या छुप्या कारवाया सुरूच होत्या. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. कोणत्याही परिस्थितीत कासीमला पकडण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. कासीम धारवाड जिल्ह्यातील एका गावात लपून बसला आहे अशी माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. उपायुक्त सचिन गुंजाळ, वरिष्ठ निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद झिने, नंदकुमार केंचे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, हवालदार मधुकर दाभाडे, अशोक पवार, जितेंद्र ठोके, संजय चव्हाण, नवनाथ डोंगरे, जितेंद्र सरदार, संजय चव्हाण, राजू लोखंडे, संदीप भोईर, योगेश बुधकर, सुधीर पाटील, राहुल शिंदे, नवनाथ बोडके, अनंत देसले, कुंदन भांबरे, अविनाश पाटील याचे पथक कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यात दाखल झाले.

पोलिसांनी कासीम राहत असलेल्या अलनवार गावाला वेढा घातला. त्याचा गावातील घराघरात जाऊन शोध सुरू केला. आपणास पोलिसांनी घेरले असल्याची कुणकुण लागताच कासीमने तो लपून बसलेल्या घराची कौले काढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. गावाच्या चहूबाजूने वेढा टाकलेल्या पोलिसांनी कासीमचा पाठलाग करून त्याला गावाच्या हद्दीत जेरबंद केले. या झटापटीत एक पोलीस जखमी झाला. कल्याणजवळील आंबिवलीमधील पाटीलनगरमधील इराणी वस्तीत कासीम राहतो. त्याच्याकडून पाच दुचाकी, एक पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. कासीमच्या अटकेने मुंबई, ठाणे जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी खडकपाडा पोलिसांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button