पुणे

पोलिसांनी हत्येचा कट उधळून लावला; मित्रानेच दिली व्यावसायिक मित्राच्या हत्येसाठी ५० लाखांची सुपारी

चार्टर्ड अकाउंटंट असलेला मित्रच निघाला मुख्य सूत्रधार

पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दरोडा विरोधी पथकाने जमीन खरेदी,विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या हत्येचा कट उधळून लावला आहे. याप्रकरणी सुपारी देणाऱ्या मित्रासह तीन जणांना दरोडा विरोधी अटक केली. यात एका महिलेचा देखील समावेश आहे. व्यावसायिक राजू माळी यांच्या हत्येसाठी मित्र विवेक लाहोटी याने सुधीर परदेशी याला पन्नास लाख रुपयांची महिलेमार्फत सुपारी दिल्याचं समोर आल आहे. आरोपीकडून ३ पिस्तुल आणि ४० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुधीर परदेशी याला नुकतच मावळ मधील सोमाटणे फाटा येथून दोन गावठी पिस्तूल आणि १६ जिवंत काढतुसासह ताब्यात घेतलं होतं. याप्रकरणी त्याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा अधिकचा तपास दरोडा विरोधी पथक करत होत. तपासामध्ये सुधीर परदेशी याने त्याचा साथीदार शरद साळवी यांच्यामार्फत मध्य प्रदेशातून तीन गावठी पिस्तूल आणि ४० जिवंत काडतुसे आणली होती.  एक पिस्तूल आणि २४ जिवंत काडतुसे हे चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या विवेक लाहोटी यांना देण्यात आले होते. त्यांना पिंपरी- चिंचवडमधून दरोडा विरोधी पथकाने अटक केली. विवेक लाहोटी हे जमीन खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करतात यात त्यांचा मित्र राजू माळी हा भागीदार होता. परंतु, राजू माळी यांच्यासोबत झालेल्या व्यवहारातील गैरसमजुतीतुन लाहोटी यांनी सुधीर परदेशी यास ५० लाख रुपयांची सुपारी देऊन राजू माळी यांची हत्या करण्याचा कट रचला होता.

दर शनिवारी आणि रविवारी राजू माळी हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या बांधकाम साईट येथे भेट देतात, तिथेच ते मुक्काम करतात. ही बाब हेरून त्याच ठिकाणी त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. तशी टेहाळणी देखील करण्यात आली होती. मात्र, त्या अगोदरच दरोडा विरोधी पथकाने हत्येचा कट उधळून लावून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक पोलिस निरीक्षक अमरीश देशमुख, पोलीस कर्मचारी गणेश सावंत, सुमित देवकर, गणेश हिंगे, रासकर यांच्या टीमने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button