नागरिकांच्या पुढाकाराने पोलीस उपायुक्तांना निवेदन, कल्याण पूर्वेतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करा
कल्याण पूर्व भागातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, अशी मागणी कल्याण पूर्व भागातील नागरिकांनी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन केली.
कल्याण: कल्याण पूर्व भागात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. सामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त होत चालले आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. कल्याण पूर्व भागातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, अशी मागणी कल्याण पूर्व भागातील नागरिकांनी गुरुवारी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन केली. या भेटीत सामान्य महिला वर्गाची संख्या सर्वाधिक होती. गेल्या काही दिवसापूर्वीच कल्याण पूर्व भागात एका गुन्हेगाराने एका अल्पवयीन मुलीला दिवसा रस्त्यात अडवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. दोन अन्य घटनांमध्ये कोयत्याचा वार करुन दोन जणांना गंभीर जखमी करण्यात आले होते.
बुधवारी रात्री एका अल्पवयीन मुलीला तिच्या घराच्या दारात एक तरुणाने निर्घृणपणे हल्ला करुन ठार मारले. या घटनांमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा दुर्देवी घटना वाढत आहेत, असे नागरिकांनी उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. माजी नगरसेवक महेश गायकवाड, नीलेश शिंदे, सुशीला माळी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. कल्याण पूर्व भागातील बहुतांशी पोलीस चौक्या बंद आहेत. त्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात. पूर्व भागातील पोलिसांची गस्त वाढवावी. पोलीस मित्र संकल्पना पुन्हा सुरू करण्यात यावी. शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी. निर्जन स्थळी काही तरुण तरुणी फिरण्यासाठी जातात. तेथे काही गैरप्रकार होतात. अशी निर्जन ठिकाणे शोधून तेथे गस्ती पथकाच्या फेऱ्या वाढवाव्यात अशा मागण्या नागरिकांकडून उपायुक्तांना करण्यात आल्या.