कोस्टल रोडच्या किंमतीत भरमसाठ वाढ; ३५ कोटींचे कंत्राट ८५ कोटींवर
कोस्टल रोडच्या कामाच्या सल्लागार शुल्कात घसघशीत वाढ झाली आहे. ३५ कोटींचं मूळ सल्लागार कंत्राट आता ८५ कोटींवर पोहोचलं आहे.
मुंबई: सागरी किनारी मार्गाच्या (कोस्टल रोड) कामात वेळोवेळी झालेली वाढ, आराखड्यात झालेला बदल या बाबी प्रकल्प सल्लागाराच्या पथ्यावर पडल्या आहेत. प्रकल्पाचे काम वाढल्यामुळे सल्लागार शुल्कातही घसघशीत वाढ झाली आहे. सन २०१७ ते २०२३ या सहा वर्षांत तब्बल ५० कोटी रुपयांनी हे शुल्क वाढल्याने सल्लागाराची अक्षरश: चांदी झाली असून मूळ ३५ कोटीचे सल्लागार कंत्राट आता ८५ कोटींवर पोहोचले आहे. शहर आणि पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प उभारला जात असून पहिल्या टप्प्यात मरीन ड्राइव्ह ते वरळी या सुमारे १० किमी अंतराचे काम सुरू आहे. प्रकल्प आतापर्यंत ७८.८४ टक्के पूर्ण झाला असून जून २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज आहे. प्रकल्पासाठी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी-एचडीसी, लार्सन अॅण्ड टुब्रो या कंपन्यांना कामे देण्यात आली असून मे. एईकॉम एशिया कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २३ जानेवारी २०१७ पासून ६८ महिन्यांसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. कामाचे कंत्राट त्यावेळेस ३४ कोटी ९२ लाख रुपये होते.
गेल्या सहा वर्षांत प्रकल्पाच्या कामात काही वेळा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. त्यामुळे रचनेत बदल करावे लागले. गेल्या दोन वर्षांपासून वरळी येथील समुद्रात मच्छिमारांच्या बोटींच्या प्रवेश मार्गाचा वाद सुरू होता. पालिकेने प्रकल्पातील दोन स्तंभामधील अंतर ६० मीटर ठेवले होते. ते २०० मीटर करण्याची मागणी मच्छिमारांनी लावून धरली होती. अखेरीस स्तंभामधील अंतर १२० मीटर करून हा वाद संपुष्टात आला. त्यामुळे प्रकल्पात काही तांत्रिक बदल करण्यात येत आहेत. प्रकल्पात हे अतिरिक्त काम असून या कामातील बदलाचा अनुभव असलेल्या तज्ज्ञांचा गट नेमून सल्लागाराला काम करावे लागते आहे. या तज्ज्ञांमध्ये संरचना तज्ज्ञ, सुरक्षा तज्ज्ञ यांचा समावेश आहे. हे तज्ज्ञ विशेष कामांकरीता ओळखले जात असून त्यांचा परदेशातील कामांचा अनुभव आहे. हे तज्ज्ञ वेळोवेळी कामाला भेट देणार आहेत. या बदलामुळे सल्लागाराने ८ कोटी ५ लाख रुपये इतके वाढीव शुल्क प्रस्ताविले होते. सल्लागाराशी केलेल्या वाटीघाटीनंतर ७ कोटी २१ लाख रुपये शुल्क देण्याची शिफारस करण्यात आली आहे. शुल्क वाढीच्या या प्रस्तावाला पालिका प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
असे वाढले सल्लागार शुल्क
मूळ कंत्राट : ३४ कोटी ९२ लाख ३२ हजार
पहिली वाढ : ५ कोटी ९१ लाख २९ हजार
दुसरी वाढ : ५ कोटी २२ लाख ५ हजार
तिसरी वाढ : ४ कोटी ५२ लाख ६५ हजार
चौथी वाढ : २७ कोटी ९५ लाख
पाचवी वाढ : ७ कोटी २१ लाख
एकूण वाढ : ५० कोटी ७२ लाख