महिला डॉक्टरांशी वाद घालणे पडले महागात..आरोपीला कोर्ट उठे पर्यंत बसून राहण्याची व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा.
नाशिक (DAKSH POLICE NEWS)- जिल्हा व सत्र न्यायालयाने शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकास कोर्ट उठे पर्यंत बसून राहण्याची व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. २०१४ मध्ये जुने नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे ही घटना घडली होती.
वडिलांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यास विलंब होत असल्याचा आरोप करून आरोपीने महिला डॉक्टरवर हल्ला केला होता. त्याप्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली. अजमद अकबर खान (३२ रा. नाईकवाडीपुरा,अजमेरी मस्जीद जवळ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
२३ ऑक्टोंबर २०१४ रोजी सकाळच्या सुमारास डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे डॉ.स्नेहल बागडे (रा.विवेकानंदनगर,गंगापूररोड) हे सेवा बजावत अशतांना ही घटना घडली. याप्रकरणी डॉ. बागडे यांनी तक्रार केली होती. त्यात डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे ओपीडीमध्ये पेशंट तपासत असतांना आरोपीने येवून तुम्हाला वडिलांचे प्लास्टर व ऑपरेशन करता येत नाही का ? या कारणातून वाद घालत शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केल्याचे म्हटले होते.
या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा, महाराष्ट्र वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य,मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध कायदा व अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन सहाय्यक निरीक्षक एच.एम.लांडे यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात सादर केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. यु.जे.मोरे यांच्यासमोर हा खटला चालला. सहाय्यक सरकारी वकिल अॅड. रविंद्र निकम यांनी सहा साक्षीदार तपासले असता न्यायालयाने आरोपीस शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोषी ठरवत कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची तसेच पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.