लढून माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठ्यांची विजय यात्रा निघेल’, मनोज जरांगेंचा थेट इशारा
जानाल : ‘लढून माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठ्यांची विजय यात्रा निघेल’ असं मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना सरकारला थेट इशारा दिलाय.
मनोज जरांगे यांनी 24 तारखेला अल्टिमेटम संपल्यानंतर आमरण उपोषण करणार असल्याचं म्हटलंय. त्यानंतर सरकारने जर 24 तारखेपर्यंत जर आरक्षण मिळालं नाही, तर जरांगे त्यांच्या उपोषणाची पुढची दिशा ठरवतील. याविषयी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं आश्वासन दिलंय. पण मनोज जरांगे यांनी आता त्यांची आक्रमक भूमिका जाहीर केलीये. ‘नेत्यांनी कायद्याच्या पदावर बसलेल्या लोकांनी गावात यायचं नाही’ , असा देखील थेट इशारा त्यांनी दिला. ‘आम्ही तुमच्या दारात येत नाही, तुम्ही आमच्या दारात यायाचं नाही’ असं जरांगे म्हणालेत.
पहिल्याच टप्प्यात आरक्षण मिळेल – मनोज जरांगे
मनोज जरांगे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, ‘मराठा समाजाला उद्रेक करायची इच्छा नाही. उद्रेक करून आरक्षण मिळण्याची खात्री नाही. त्यामुळे शांततेच्या युद्धातच सरकार जेरीस येईल. आमरण उपोषणाचं गांभीर्य आता सरकारला नसेल, पण जेव्हा सुरु होईल तेव्हा कळेल. मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखून वेळ दिला. मी 25 किंवा 28 तारखेला मोठा गौप्यस्फोट करेन. पण तो असा असेल की सरकारला आरक्षणाबाबात फिरता येणार नाही.’
‘मुलगा म्हणून सांगतोय…’
‘मी सरकारला मुलगा म्हणून सांगतोय, शहाणे व्हा. आतापर्यत केलेल्या चालीचा, आंदोलन हल्ल्यात झालेल्या परिणामांविषयी मी गौप्यस्फोट करणार आहे. मला माहितेय मराठ्यांचे नेते नाईलाज म्हणून मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत. पण आता आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही’, असं मनोज जरांगे म्हणाले.
आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या उपोषण आंदोलन कोणतेही उपचार घेणार नसून पाणीदेखील पिणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन करताना जरांगे यांनी शांततेतील आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला. मंत्री, आमदार, खासदार, प्रशासनातील लोकांना गावबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली.