पहिला शहीद अग्निवीर अक्षय गवतेच्या कुटुंबाला मिळणार 1 कोटी 13 लाखांची भरपाई, कसे ते जाणून घ्या.
सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना अग्निवीर अक्षय गवते यांना वीरमरण आले. शहीद झालेले गवते हे देशातील पहिले अग्निवीर असून ते मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराईचे राहणारे आहेत. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लष्कराने अग्निवीर अक्षय गवते यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबाला एक कोटींहून अधिक रुपयांची भरपाई मिळणार असल्याची माहिती दिली आहे.
अक्षय गवते हे 30 डिसेंबर 2022 रोजी अग्निवीर म्हणून सैन्यात दाखल झाले होते. सियाचीनमध्ये काराकोरम रेंजमध्ये जवळपास 20 हजार फुटांवर ते कर्तव्य बजावत होते. कर्तव्य बजावताना 20 ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, पहिला शहीद अग्निवीर अक्षय गवतेच्या कुटुंबाला एक कोटींहून अधिक रुपयांची भरपाई मिळणार असल्याचे पोस्ट लष्कराने केली आहे. सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना अग्निवीर अक्षय गवते शहीद झाले. दु:खाच्या या प्रसंगी हिंदुस्थानी लष्कर त्याच्या कुटुंबियांसोबत पाय रोवून उभे आहे. मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसंदर्भात सोशल मीडियावर परस्परविरोधी मेसेज पाहिल्यानंतर आम्ही हे स्पष्ट करू इच्छित आहोत की त्याच्या कुटुंबियांना मिळणारी भरपाई सैनिकाच्या संबंधित अटी व शर्तींद्वारे नियंत्रित केले जाते, असे लष्कराने ट्विटमध्ये म्हटले आहे. यासोबत त्याला नक्की किती आणि कशी रक्कम मिळेल हे देखील लष्कराने स्पष्ट केले आहे.
– शहीद अग्निवीर अक्षय गवतेच्या कुटुंबाला विम्याचे 48 लाख रुपये मिळतील.
– 44 लाख रुपयांचे अनुदान मिळेल.
– सेवा निधीतून (30 टक्के) रक्कमही अग्निवीराच्या कुटुंबाला मिळेल. यात सरकारचेही समान योगदान असेल आणि त्यावरील व्याजाचाही यात समावेश असेल.
– अग्निवीराचा मृत्यू झाला त्या तारखेपासून पुढील चार वर्ष पूर्ण होईपर्यंत उर्वरित सेवाकाळाचाही पैसा मिळेल. ही रक्कम साधारण 13 लाखांपेक्षा जास्त असेल.
– आर्मी वाईव्स वेलफेअर असोसिएशनकडून तात्काळ 30 हजारांची आर्थिक मदत
– विमा, अनुदान आणि इतर आर्थिक मदत मिळून ही रक्कम 1 कोटी 13 लाखांहून अधिक होते.