ठाण्यात देवीच्या आरतीसाठी पोहोचले ‘आनंद दिघे’; सर्वच झाले अवाक्
ठाणे – आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. अभिनेता प्रसाद ओकने या सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर लवकरच धर्मवीर 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगला टेंभी नाक्यावर अष्टमीला देवीच्या दर्शनाने सुरूवात झाली.
अष्टमीला धर्मवीर आनंद दिघे साहेब याठिकाणी आरती घेत असे. यंदाच्या अष्टमीला प्रसाद ओकने अचानक येथे भेट देत तो क्षण पुन्हा जिवंत केला. प्रसाद ओकने धर्मवीर आनंद दिघे यांच्या वेशभूषात येऊन अष्टमीनिमित्त आरती करत धर्मवीर दिघे यांची टेंभीनाक्याची नवरात्री उत्सवातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रसाद ओकला पाहण्यासाठी ठाण्यातील टेंभीनाका परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुर्गेश्वरीचे दर्शन घेतानाचे प्रसाद ओकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, धर्मवीरचे निर्माते मंगेश देसाई दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी 9 ऑगस्ट रोजी जेजुरी येथे खंडोबाचे दर्शन घेऊन ‘धर्मवीर’च्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केली होती. जेजुरी गडावरून दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी पोस्टरचे अनावरण देखील केल्याचे पाहायला मिळाले.
निर्माता मंगेश देसाई यांनी याबाबतची एक खास पोस्ट आपल्या सोशल मीडियावरून शेअर केली होती. पोस्टमध्ये त्यांनी लिहीले होते की, “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1 च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र सगळ्या जनतेसमोर आलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब यामाध्यमातून सर्व जगात पोहोचले आणि ‘असा माणूस होणे नाही’ हेही सर्वांना समजलं. त्यांचा आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, म्हणूनच ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे – भाग 2 ह्याचं चित्रीकरण आम्ही सुरू करतोय, लवकरच…बघुया धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट.. लवकरच”