गुन्हेगारीमुंबई

CRIME MUMBAI : आई-वडिलांशी वाजलं, म्हणून मुलाला उचललं, एकाला अटक

त्या दिवशी खुर्शीद यांनी त्यांच्या १२ वर्षांच्या मुलाला घराजवळच्या दुकानातून सामान आणण्यासाठी पाठवले होते. मात्र तो बऱ्याचा वेळानंतर धावत-पळत घरी आला, खूप रडत होता.

मुंबई | 25 ऑक्टोबर 2023 : पालकांशी असलेल्या जुन्या वादाच्या रागातून त्यांच्या 12 वर्षांच्या मुलाचं अपहरण  करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र सुदैवाने तो डाव फसला आणि तो मुलगा अपहरणकर्त्याच्या हातातून निसटून सुखरूप घरी पोहोचला. कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कसून तपास करत आरोपीला बेड्या ठोकून अटक केली.मुंबईतील आरसीएफ कॉलनीतील हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी इमाम हुसेन रहीम कुरेशी (३५) याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहे. १२ वर्षांचा हा मुलगा दुकानात किराणा सामान आणायला जात असताना, आरोपीने जबरदस्ती त्याला रिक्षात बसवले. पण त्या मुलाने त्याच्याशी लढा दिला, हाताला चावून तो कसाबसा तिथून निसटला आणि पळत पळत घरीच आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इमाम हुसेन रहीम कुरेशी आणि पीडित मुलाच्या कुटुंबियामध्ये फार पूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. मात्र इमामच्या मनात त्याबद्दल अजूनही राग होता. त्याच रागातून त्याने हे कृ्त्य केले. त्या कुटुंबाला घाबरवण्यासाठीच त्याने त्यांच्या मुलाच्या अपहरणाचा डाव रचला, मात्र तो फसला.

पोलिसांच्या सांगण्यानुसार, फिर्यादी खुर्शीद शेख (३३) या गृहिणी असून, वाशी नाका, चेंबूर येथे पती, मुले आणि पालकांसह राहतात. त्यांचे पती महाबळेश्वर येथे चालक म्हणून काम करतात. ही घटना १६ ऑक्टोबर रोजी घडली. त्या दिवशी खुर्शीद यांनी त्यांच्या १२ वर्षांच्या मुलाला घराजवळच्या दुकानातून सामान आणण्यासाठी पाठवले होते. मात्र तो बऱ्याचा वेळानंतर धावत-पळत घरी आला आणि खूपच रडत होता. त्याला मोठा धक्का बसला.

खुर्शीद यांनी त्याला जवळ घेऊन, प्रेमाने त्याची विचारपूस केली असता त्याने संपूर्ण प्रकार कथन केला. आरोपीने आपला हात खेचून जबरदस्ती रिक्षात बसवले आणि तो तिथून निघायच्या प्रयत्नात होता. मी त्याला धक्का दिला, हातावर जोरात चावलो आणि कसाबसा तिथून पळू आलो, असे पीडित मुलाने त्याच्या आईला सांगितलं.

हे सगळं ऐकून त्याही हादरल्या, मात्र नंतर त्यांनी त्यांचा भाऊ आणि तिचा मुलगा यांच्यासह तिने अपहरणकर्त्याचा शोध घेण्याचे ठरवले. आरोपीने त्याला जिथून उचलले , तिथे सगळे जण गेले. पीडित मुलासह सर्वांनीच अनेक दिवस संशयित अपहरणकर्त्यावर पाळत ठेवली आणि अखेर सोमवारी त्या मुलाने आरोपी कुरेशीला ओळखले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

कुटुंबीयांनी आरोपी कुरेशीला पकडून ठेवले आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कुरेशीला ताब्यात घेतले. पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीच्या आधारे कुरेशीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 363 , 511 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला, असे आरसीएफ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण मांद्रे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button