कुणबी प्रमाणपत्र नको म्हटल्याचं लक्षात ठेवलं, सोलापूरमध्ये येताच मराठा आंदोलकांनी अंगावर ऑइल टाकलं, काय घडलं?
सोलापूर जिल्ह्यात देखील मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन वातावरण तापलेलं आहे.
सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलकांनी राज्यातील विविध भागात आक्रमक रुप घेतल्याचं दिसून आलं. बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्येही अशीच घटना घडली आहे. आम्ही ९६ कुळी मराठा आहोत, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको म्हणणाऱ्या तरुणावर मराठा आरक्षण आंदोलकांनी ऑइल टाकलं आहे, याशिवाय त्याला उठाबळा देखील काढायला लावल्या.प्रताप कांचन या तरुणाने तो ९६ कुळी आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको असं विधान केलं होतं. या तरुणाला सोलापूरमधील मराठा आरक्षण आंदोलकांनी उत्तर दिलं आहे. प्रताप कांचन या तरुणांच्या अंगावर मराठा बांधवांनी ऑइल टाकलं आहे.प्रताप कांचन आणि सुनील नागणे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत कुणबी मराठा प्रमाणपत्राला विरोध केला होता. प्रताप कांचन यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून पैसे घेऊन अशा पद्धतीची विधान केली असल्याचा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव यांनी मनोज जरांगे पाटील गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, असं म्हटलं. इतर संघटना देखील आंदोलन करत आहेत. प्रताप कांचन आणि सुनील नागणे यांनी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असल्याचं कुणबी प्रमाणपत्र नको असल्याचं सांगितलं. त्यामुळं ऑइल टाकल्याचं राम जाधव यांनी म्हटलं.
सोलापुरातील आक्रमक मराठा बांधवांनी प्रताप कांचन या तरुणाला उठाबशा देखील काढायला लावल्या आहेत. प्रताप कांचन या तरुणाला मराठा आंदोलकांनी जाब विचारला. यावेळी प्रताप कांचनने मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांची माफी मागितली आहे.