कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून अनोखी भेट, महागड्या दुचाकी अन् बरंच काही…होऊ दे खर्च
कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून विविध वस्तू भेट दिल्या जात आहेत. तामिळनाडूतील एका चहा उत्पादक कंपनीनं कर्मचाऱ्यांना रॉयल एनफिल्ड भेट दिल्या आहेत.
चेन्नई : दिवाळीला आता एक आठवड्यांचा कालावधी राहिलेला असताना बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी सुरु आहे. दुसरीकडे दिवाळीनिमित्त विविध कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची परंपरा जपत असल्याचं दिसून येतं. अनेक कंपन्या किंवा संस्थांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना मिठाई, फटाके, कपडे, प्रोत्साहन भत्ता देत असतात. तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यातील कोटागिरी गावातील चहा उत्पादक कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना रॉयल एनफिल्ड कंपनी च्या दुचाकी गाड्या दिवाळी बोनस म्हणून देत आश्चर्याचा धक्का दिला आहे.कोटागिरी गावातील चहा उत्पादक कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आम्ही अशा प्रकारच्या गिफ्टची कल्पना केली नव्हती, असं म्हटलं. कोटागिरी गावातील या कंपनीनं १५ रॉयल एनफिल्ड दुचाकी कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून भेट दिल्या आहेत. एका रॉयल एनफिल्ड ची किंमत साधारणपणे २ लाख रुपपयांच्या आसपास आहे.
कोटागिरीतील पी. शिवकुमार यांचा १९० एकरावर चहाचा मळा आहे. दरवर्षी ते त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस म्हणून घरगुती उपकरण किंवा रोख रक्कम देत असतात. मात्र यावर्षी त्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी चांगली कामगिरी करणाऱ्या १५ कामगारांना रॉयल एनफिल्ड भेट दिल्या आहेत. पी. शिवकुमार यांच्याकडे एकूण ६२७ कर्मचारी काम करतात. त्यापैकी व्यवस्थापक, सुपरवायजर, भांडारपाल, कॅशिअर, चालकांना दुचाकी भेट दिल्या आहेत.कर्मचाऱ्यांना दुचाकी भेट दिल्यानंतर पी. शिवकुमार त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत राइडवर गेले होते.