ठाणे शहरात दहा टक्के पाणी कपात लागू; शहराचा विभागवार पंधरा दिवसातून एकदा पाणी पुरवठा बंद राहणार
ठाणे: जिल्ह्यातील भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे ठाणे महापालिकेच्या योजनेतून शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात लागू करण्यात आली आहे. याशिवाय, मुंबई महापालिकेकडून शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात लागू करण्यात आली आहे. परंतु दहा टक्के पाणी कपातीची झळ दररोज बसू नये म्हणून पालिकेने पंधरा दिवसातून एकदा विभागवार पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तसे नियोजन केले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जातात. त्यापैकी स्वत:च्या योजनेसाठी महापालिका प्रशासन भातसा नदीपात्रातील पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलते. या पाण्याचा शहरात पुरवठा करण्यात येतो.शिवाय, मुंबई महापालिकाही येथून पाणी उचलून त्याचा मुंबई शहरासह ठाण्यात पुरवठा करते. या बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी बसविण्यात आलेल्या यंत्रणेत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधी करण्यात येणार आहे. या कामादरम्यान बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार आहे. त्यामुळे ठाणे आणि मुंबई महापालिकेने ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्या दहा टक्के कपात लागू केली आहे. मुुंबई महापालिकेकडून ठाणे शहरात दररोज ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. हा पुरवठा कोपरी, हाजुरी, गावदेवी, पांचपाखाडी, टेकडी बंगला, किसननगर १-२, भटवाडी या भागात करण्यात येतो. या भागात दहा टक्के पाणी कपात लागू होणार आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या योजनेतून शहरात सर्वच ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येतो. दहा टक्के पाणी कपातीची झळ दररोज बसू नये म्हणून पालिकेने पंधरा दिवसातून एकदा विभागवार पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तसे नियोजन केले आहे.
असा बंद राहणार पाणी पुरवठा
वार | पाणी बंदचे ठिकाण |
सोमवार | ब्रम्हांड, बाळकुम |
मंगळवार | घोडबंदर रोड |
बुधवार | गांधीनगर |
गुरुवार | उन्नती, सरकारपाडा, सिद्धाचल |
शुक्रवार | मुंब्रा (रेतीबंदर) |
शनिवार | समता नगर |
रविवार | दोस्ती आकृती |
सोमवार | जेल |
मंगळवार | जॉन्सन, अनंतकाळ |
बुधवार | साकेत, रुस्तमजी |
गुरुवार | सिध्देश्वर |
शुक्रवार | कळवा, खारेगाव, आतकोणेश्वर नगर, ४ |
शनिवार | इंदिरा नगर |
रविवार | ऋतुपार्क |