बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर,आज 67 वा महापरिनिर्वाण दिन
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. त्यांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. लाखों लोकांच्या भावनांना ओघ आला, त्यांनी शोक व्यक्त केला, प्रार्थना सभा घेतल्या आणि श्रद्धांजली वाहिली. आज 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने, ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे जनक’ म्हणूनही ओळखलं जातं. अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला.
भारतातील वर्ग लढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले होते.
स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश सरकारमध्ये मजूर मंत्री होते. त्यांनी त्या कालावधीत भारतीय कामगारांसाठी अनेक मोलाचे कायदे करून घेतले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप 1928-1934 या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप सात वर्ष सुरू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला. 17 सप्टेंबर 1937 रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले. 10 जानेवारी 1938 रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली 25 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.
बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आदी पाक्षिके, वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली होती. त्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांचे प्रश्न उचलून धरले. अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय,1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याच्या दोन महिन्याच्या आत त्यांचे महापरिनिर्वाण झाले.