डोंबिवलीत उपायुक्तांच्या सततच्या पाहणीमुळे फेरीवाले गायब; फडके रस्ता, नेहरू रस्ता, रामनगर परिसर फेरीवाला मुक्त
डोंबिवली: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरात एकही फेरीवाला दिसता कामा नये, असे कठोर आदेश पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. साहाय्यक आयुक्त, फेरीवाला हटाव पथकांकडून फेरीवाल्यांवर कठोर कारवाई होते की नाही हे पाहण्यासाठी अतिक्रमण नियंत्रक उपायुक्त अवधूत तावडे हे नियमित डोंबिवलीत फेऱ्या मारत असल्याने रेल्वे स्थानक परिसरात गेल्या आठवड्यापासून एकही फेरीवाला दिसत नाही.
उपायुक्त अवधूत तावडे हे डोंबिवलीतील प्रभाग साहाय्यक आयुक्तांना पूर्वसूचना न देता अचानक डोंबिवली रेल्वे स्थानक भागात फेरफटका मारून फेरीवाल्यांवर कारवाई होते का याची पाहणी करत आहेत. उपायुक्तांच्या दौऱ्यामुळे फ, ग आणि ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथके सक्रिय झाली आहेत. आयुक्त डाॅ. जाखड यांनी पदभार स्वीकारल्यापासून रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसता कामा नये, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आयुक्त जाखड यांच्या शिस्तप्रिय कार्यपध्दतीमुळे कारवाईचा बडगा नको म्हणून आता प्रभागातील अधिकारी, फेरीवाला हटाव पथके तत्परतेने फेरीवाल्यांवर कारवाई करत आहेत.