डोंबिवलीत आगरी महोत्सवाला प्रारंभ; व्यवसायाच्या वाटा निवडण्याचे आवाहन आगरी तरूणांना नोकरी
डोंबिवली : आगरी समाज संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या, ठाणे जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक परंपरेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एकोणिसाव्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी आगरी समाजातील प्रतिष्ठीत नेत्यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी आगरी समाजातील तरूणांनी नोकरी, व्यवसायाच्या वाटा निवडाव्यात समाजाला दिशादर्शक म्हणून पुढे यावे, असे आवाहन यावेळी विविध मान्यवरांनी उद्घाटना नंतरच्या कार्यक्रमात केले.
आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीत सावळाराम महाराज क्रीडासंकुलात २० डिसेंबरपर्यंत आगरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनाला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय आगरी परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, संयोजन समिती अध्यक्ष गुलाब वझे, वसंत पाटील, गंगाराम पाटील, सुरेश पाटील, डाॅ. संगीता पाटील, शरद पाटील, पांडुरंग म्हात्रे, नवनीत पटेल, बबन महाराज उपस्थित होते.विविध समाजाच्या आरक्षणाच्या विषयावरून आता सुरू असलेल्या वादंगावरून उपस्थित मंडळींनी भाष्य केले. आगामी काळात शिक्षण, राजकीय क्षेत्रात समाजाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आगरी समाजाने संघटितपणे राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सावळाराम महाराज यांच्या स्मारकासाठी आगरी युथ फोरम प्रयत्नशील आहे. एक अध्यात्मिक पीठ या निमित्ताने कल्याण-डोंबिवली परिसरात उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांचे सहकार्य मिळत आहे, असे गुलाब वझे यांनी सांगितले. यावेळी आगरी समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.