Uddhav Thakeray: करणार मोर्चाचे नेतृत्व,धारावी वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात
‘धारावी वाचवा, मुंबई वाचवा’ या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. मोर्चासाठी धारावी सज्ज झाली आहे. टी जंक्शन ते अदाणी समूहाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा निघेल.
या मोर्चाला पोलिसांची परवानगी दिलेली नसून हा मोर्चा काढणारच, असा निर्धार धारावी बचाव आंदोलनाने केला आहे.
गेल्या १९ वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास अदाणी समूहाच्या वतीने मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत; मात्र प्रकल्पाच्या विरोधात आता वातावरण तापले आहे. धारावी वाचवा या मागणीसाठी उद्याचा सर्व राजकीय विरोधी पक्षांचा भव्य मोर्चा निघणार आहे. या मोर्चात १४ राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक संस्था आणि रहिवासी सहभागी होणार आहेत.
धारावीतील आणि धारावीबाहेरचे असे एक लाख लोक या मोर्चात सहभागी होतील, अशी माहिती धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक राजू कोरडे यांनी दिली. उद्या निघणाऱ्या मोर्चाच्या मार्गावर बॅनर्स लावण्यात आले आहेत. संपूर्ण परिसर भगवा झाला आहे. या मोर्चाची तयारी झाली असल्याची माहिती कोरडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
– विविध प्रकल्पांच्या माध्यमातून धारावीतील झोपडीधारकांना धारावीच्या बाहेर हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू असून यापूर्वी विविध विकास प्रकल्पांकरिता धारावीबाहेर विस्थापित केलेल्या झोपडीधारकांची यादी जाहीर करून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करा.
– धारावीतील सर्व झोपडीधारकांचे नव्याने सर्वेक्षण करून सर्वेक्षणाची शेवटची तारीख हाच पात्रता दिनांक ठरवून सर्व निवासी आणि अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवा आणि या सर्व पात्र निवासी व अनिवासी झोपडीधारकांची यादी जाहीर करून त्यानंतरच पुनर्विकासाचे काम सुरू करा.
– सर्व निवासी झोपडीधारकांना ५०० चौरस फुटांचे घर मोफत द्या. पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतीतील रहिवाशांना ७५० चौरस फुटांचे घर मोफत द्या.
– अनिवासी-औद्योगिक व्यापारी वापराच्या गाळेधारकांना, गोदाम मालकांना वापरात असलेल्या आकाराचे अनिवासी पुनर्वसन गाळे मोफत द्या.
– प्रकल्पाचा सुटसुटीत ‘मास्टर प्लान’ जाहीर करा.
– धारावीतील झोपडीधारकांच्या भविष्यातील देखभाल खर्चाकरिता प्रति पुनर्वसन गाळा २५ लाख रुपयांची तरतूद करा.