Nagpur:स्थानकावर गोंधळ, दादर स्थानकाच्या नामांतराची मागणी,रेल्वे रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला!
रेल्वे रोखण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर आलेल्या संविधान आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.
Nagpur : रेल्वे रोखण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर आलेल्या संविधान आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. कायदेशीर कारवाईनंतर त्यांना सोडून देण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेल्वे रोको करण्याचा त्याचा प्रयत्न हाणून पाडला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास पश्चिम प्रवेशद्वाराजवळ घडला.
संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे आणि प्रदेश अध्यक्ष राकेश बग्गन पदाधिकाऱ्यांसह भुसावळहून नागपुरात आले.
रेल रोको आंदोलन करण्याच्या उद्देशाने एक एक करीत रेल्वे स्थानक परिसरात गोळा झाले. त्यांच्या जवळ राष्ट्रीय ध्वज, संविधानाची प्रत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा होती. प्रचंड नारेबाजी करीत रेल्वे स्थानक परिसरात आले. अचानक झालेल्या गोंधळामुळे पोलिस सज्ज झाले.
आंदोलनकर्त्यांनी रेल्वे स्थानकाच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफच्या पथकाने मानवी साखळी तयार करून त्यांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. पोलिसांचा ताफा प्रचंड असल्याने शेवटी कार्यकर्ते जमिनीवर लोटले. लोटांगण घेत त्यांनी पोलिस प्रशासनाचा निषेध करीत हुकूमशाही नही चलेगी अशी नारेबाजी केली.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चैत्यभूमी दादरचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे करण्यात यावे, तसा ठराव अधिवेशनात पारित करण्यात यावा, आदी मागण्या त्यांनी केल्या. मागण्याचे निवेदन स्टेशन उपव्यवस्थापक अतुल श्रीवास्तव यांना दिले. यावेळी लोहमार्ग पोलिस निरीक्षक मनीषा काशीद, आरपीएफ निरीक्षक आर. एल. मीणा यांच्यासह पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. आंदोलनात संविधान आर्मीचे आरीफ शेख, हरीष सुरवाळे, संघपाल किर्तीकर, गोपी साळी, धनराज गोळे, बुद्धभूषण वानखेडे, संदीप पन्हाळ यांचा समावेश होता.