डोंबिवली मोठागाव खाडीत बेकायदा रेती उपसा- दिवस-रात्र
डोंबिवली;महसूल विभागाकडून रेती माफियांवर नियमित कारवाई सुरू असताना ठराविक भागात वाळू तस्कर महसूल अधिकाऱ्यांना दाद देत नसल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. वाळू तस्कर शस्त्रसज्ज असल्याने कोणीही स्थानिक नागरिक, महसूल अधिकारी या तस्करांना रोखण्यासाठी पुढाकार घेत नाही. मोठागाव, कोपर भागातील उल्हास खाडीत गेल्या काही दिवसांपासून १० ते १२ सक्शन पंप तैनात ठेवण्यात आले आहेत. या पद्धतीने हा बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. उपसा केलेली वाळू रात्रीच खाडी किनारी आणली जाते आणि तात्काळ डम्परमध्ये टाकून विक्रीसाठी नेली जाते, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.जिल्हा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या सातत्यापुर्ण कारवाईमुळे गेल्या काही काळापासून काही प्रमाणात नियंत्रीत असलेला ठाणे जिल्ह्यातील खाडी पात्रामधील बेकायदा रेती उपशा पुन्हा एकदा जोरात सुरु झाला आहे. डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव, कोपर भागात दिवस, रात्र बिनधोकपणे रेती उपशा केला जात असून उल्हास खाडीतून सक्शन पंपाच्या साहाय्याने सुरु असलेल्या या अवैध प्रकाराकडे शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. उपसलेली रेती तात्काळ खाडी किनारी आणून ती डम्परमध्ये टाकून विक्रीसाठी नेली जात आहे.मोठागाव रेतीबंदर भागात माणकोली उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या भागात सतत वाळू उत्खनन करून भविष्यात पुलाला धोका निर्माण होण्याची भीती बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. महसूल विभागाला वाकुल्या दाखवत या बेकायदा वाळूची डम्परप्रमाणे ३० ते ३५ हजार रूपयांपर्यंत माफियांकडून विक्री केली जाते. वाळू तस्करांनी कोपर भागात रेल्वे मार्गाला धोका निर्माण होईल, अशा पध्दतीने उत्खनन केले आहे. कोपर भागातील कांदळवन क्षेत्र वाळू तस्करांनी नष्ट करून या भागाला पावसाळ्यात सर्वाधिक धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण केली आहे. डोंबिवली शहराचा एक महत्वपूर्ण भाग वाळू तस्करांनी नष्ट करायचा धरला आहे. हे माहिती असुनही महसूल अधिकारी याविषयी आक्रमक भूमिका घेत नसल्याने पर्यावरणप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. वाळू तस्करांनी डोंबिवली खाडी किनारची खारफुटी नष्ट केली आहे. त्यामुळे अनेक पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. स्थलांतरित पक्ष्यांचे निवारे नष्ट केले आहेत, असे निसर्गप्रेमींनी सांगितले. आमच्या या भागात नियमित कारवाई सुरू असतात. मोठागाव, कोपर भागात वाळू उपसा सुरू असेल तर पोलीस बंदोबस्त घेऊन वाळू तस्करांवर कारवाई केली जाईल, असे एका महसूल अधिकाऱ्याने सांगितले. डोंबिवलीत देवीचापाडा मेंग्या बाबा मंदिर परिसरात खाडी किनारी खारफुटी तोडून, मातीचे भराव देऊन बेकायदा चाळी उभारणीची कामे मागील काही महिन्यांपासून जोरात सुरू आहेत. याकडे पालिकेच्या ह प्रभाग अधिकारी, अतिक्रमण नियंत्रण विभागाचे लक्ष नसल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. यासंदर्भात पालिकेकडे तक्रारी केल्या तर त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले.