उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय,माळशेजमधील काचेचा पूल मार्गी लागणार
माळशेज घाट ; पर्यटनाचा चेहरामोहरा बदलणारा या भागातील काचेच्या पुलाच्या उभारणीतील एक महत्वाचा टप्पा नुकताच मार्गी लागला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत माळशेज येथील काचेचा पूल प्रकल्पाला ( ग्लास गॅलरी) शासनाच्या वित्त आणि पर्यटन विभागाने तत्वत: मान्यता दिली आहे. ‘खाजगी-सार्वजनिक भागिदारी’ अथवा ‘बांधा,वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वाने हा प्रकल्प उभारावा, असेही बैठकीत ठरले आहे. त्यामुळे माळशेज घाटात पर्यटकांना नव्या रूपाने निसर्गाची अनुभूती घेता येणार आहे.ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या वेशीवर असेलल्या माळशेज घाट हा पर्यटकांना कायमच खुणावतो. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी येथे पर्यटकांची झुंबड उडते. मुरबा़ड मतदारसंघाच्या वेशीवर असलेल्या माळशेज येथील घाटाचे रूप बदलून येथील पर्यटकांना वेगळ्या प्रकारे निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी या पुलाचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला होता. यासंदर्भात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आयोजित विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित काचेच्या पुलाच्या प्रकल्पाच्या सुरक्षितेबाबतचे सर्व निकष पडताळून पाहण्याचे तसेच त्याची अचूक किंमत काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माळशेज घाटाच्या माथ्यावरील पठारावर विश्रामगृह आहे. त्यालगतच्या जागेतच काचेचा पूल प्रकल्प उभारण्यात येणार आहे. भारतात अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प असेल. वन विभागाच्या जागेत हा प्रकल्प उभारला जाईल. त्यासाठी वन विभागाला पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव आहे. वन विभागाकडे यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या अन्य परवानग्या मिळविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच कार्यवाही सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या रस्त्यालगत असणाऱ्या सुविधांच्या निकषात हा प्रकल्प बसत असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. काही दिवसांपूर्वी आमदार किसन कथोरे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली होती. या बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, आमदार किसन कथोरे, ठाण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे, अधिक्षक अभियंता श्रीमती नाग आदी उपस्थित होते.
माळशेज घाटात एका टोकाला या पुलाची उभारणी केली जाईल. येथे एक एक मजली इमारत आणि त्यासमोर काचेच्या पुलाची उभारणी केली जाईल. इमारत तसेच काचेच्या पुलावरून निसर्गाचा आस्वाद घेता येईल. यासाठी सुमारे २६५ कोटी ९७ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. ओ आकारातील काचेचा पुल आणि दोन्ही बाजुला सरळ भाग, कला दालन, उपहारगृह, उद्यान अशा अनेक गोष्टी या काचेच्या पुलाशेजारी उभ्या केल्या जाणार आहेत. त्याशेजारी पर्यटकांसाठी अनेक गोष्टींची उभारणी केली जाणार आहे.
काचेचा पूल प्रकल्पामुळे माळशेज घाटात देश-विदेशातील पर्यटक येतील आणि त्या माध्यमातून मुरबाडमधील स्थानिक आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून विकासाला चालना देणारा हा प्रकल्प ठरेल.