ठाणे

दारु, अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त ,ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा;

अंमली पदार्थांसह सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त. कासारवडवली खाडी किनारी एका निर्जनस्थळी पार्टीचे आयोजन.

ठाणे : नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव पार्टीवर गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री छापा टाकला. घोडबंदरच्या कासारवडवली परिसरात निर्मनुष्य ठिकाणी खाडीकिनारी सुरू असलेल्या या पार्टीमध्ये शंभर तरुण-तरुणी सहभागी झाले होते. दोन तरुण आयोजकांनी या पार्टीचे आयोजन केले होते. या ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी चरस, एलएसडी, एस्कैंटसी पिल्स, गांजा अशा अंमली पदार्थांसह २९ दुचाकी, मद्यसाठा असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र ठाण्यासारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रेव पार्टीमुळे या अंमली पदार्थांच्या रॅकेटबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.नववर्ष स्वागत निमित्ताने आयोजित पाटर्यामध्ये अंमली पदार्थांची विकी व सेवन होते. त्याकरीता अशा पाटर्यांवरती नजर ठेवून कडक कारवाई करण्याबाबत ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेला मध्यरात्री कासारवडवली खाडी किनारी एका निर्जनस्थळी दोन तरुणांनी तरुणाईकरिता अंमली पदार्थाच्या विक्रीसह रेव पार्टीचे आयोजन केले आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली वागळे युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि त्यांच्या टीमने पार्टीस्थळी छापा मारला. याठिकाणी ९० पुरूष व ५ महिला या अंमली पदार्थाचे सेवन करून मदयधुंद अवस्थेत डिजेच्या गाण्यावर नृत्य करीत असताना आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या इव्हेंटचे आयोजन करणा-या दोन तरुणांना ताब्यात घेवुन त्या दोघांकडून चरस ७० ग्रॅम, एलएसडी ०.४१ ग्रॅम, एस्कैंटसी पिल्स २.१० ग्रॅम, गांजा २०० ग्रॅम, बिअर,वाईन, व्हिस्की असा दारू व अमली पदार्थांचा आठ लाख तीन हजार ५६० रुपये किंमतीचा साठा पोलिसांनी हस्तगत केला.या रेव पार्टीचे आयोजन केल्यानंतर तरुणाईला सोशल मीडियावरून घटनास्थळाचा पत्ता पाठवण्यात आला होता. ठाणे, नवी मुंबई, कल्याण – डोंबिवली, मीरारोड अशा भागातून तरुण-तरुणी या ठिकाणी स्वतःच्या वाहनाने आले होते. घटनास्थळी २९ मोटारसायकली आणि गांजा पिण्याचे साहित्य आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button