अविनाश जाधवांची पोस्ट चर्चेत;त्याला कळत नव्हतं, ही सगळी राजाची…”, वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर
वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर मनसेकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले मोठे नेते वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. पक्षातून त्रास होत असल्याचं सांगत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली. तसेच त्यांनी पक्ष का सोडला तेदेखील सांगितलं. मोरे म्हणाले, मी माझे परतीचे दोर कापून टाकले आहेत. त्यामुळे मी मनसेत परतण्याचा काही प्रश्नच येणार नाही. माझी पुढील राजकीय भूमिका मी दोन ते तीन दिवसांत सर्वांसमोर मांडेन.
दरम्यान, मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर मनसेकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. कोणत्याही नेत्याने यावर भाष्य केलेलं नाही. अशातच मनसेचे ठाण्यातील शिलेदार अविनाश जाधव यांनी फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वसंत मोरेंचा उल्लेख केलेला नाही. मात्र या पोस्टचा रोख वसंत मोरेंकडे असल्याचं बोललं जात आहे. यावरील मनसे कार्यकर्ते, अविनाश जाधव समर्थक आणि वसंत मोरे समर्थकांच्या कमेंट्स पाहता ही पोस्ट वसंत मोरेंबाबत असल्याचं दिसत आहे. या पोस्टच्या कमेंट्स सेक्शनमध्ये वसंत मोरेंच्या मनसे सोडण्याबाबत आणि त्यामागील कारणांवर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा चालू आहे.या पोस्टमध्ये अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे की, एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा. तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं, आरती ओवाळली जायची, धुमधडाक्यात राजाचं स्वागत केलं जायचं. तेव्हा त्या हत्तीला वाटायचं आपलंच औक्षण आणि आरती केली जात आहे. त्याला कळत नव्हतं की ही सगळी राजाची पुण्याई आहे. राजामुळे त्याला हा मान मिळत आहे.“मी मागची २५ वर्षे सुरुवातीच्या कालावधीत शिवसेनेत राज ठाकरेंसह काम केलं. पुणे शहरांतला मी पहिला कार्यकर्ता त्यावेळी होतो. आजपर्यंत राज ठाकरेंसह होतो. मात्र आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य पदाचा आणि इतर सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. मागच्या दीड वर्षापासून मी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र माझ्याविरोधात कारवाया वाढल्या. इच्छुकांची यादी पक्षातली वाढली. ज्या लोकांवर पुणे शहराची जबाबदारी होती त्या लोकांनी जो अहवाल केला त्यात पुणे शहर मनसेची स्थिती नाजूक आहे अशा गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहचवल्या. नकारात्मक अहवाल माझ्याविरोधात पाठवण्यात आला. तेव्हापासून पुण्यात मनसे लोकसभा लढवू शकत नाही असं त्यातून सांगण्यात आलं.”