maharastra

“राजीनाम्यानंतर राज साहेबांचा फोन आला, मी म्हणालो…”, वसंत मोरे स्पष्ट बोलले

वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांचा फोन आल्याची प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख होती. माजी नगरसेवक असलेल्या वसंत मोरे यांनी आपल्या हातोडा स्टाईलने पुण्यात स्वतःचे वलय निर्माण केलं होतं. मागच्या दोन वर्षांपासून त्यांचा आणि पुण्यातील पक्ष संघटनेचा वाद सुरू होता. पक्षातील वरिष्ठांकडून यावर अनेकदा तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र मंगळवारी (दि. १२ मार्च) वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. यानंतर आज एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत असताना मोरे यांनी राज ठाकरेंचा त्यांना फोन आल्याचं सांगितलं. मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर मनसेकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. कोणत्याही नेत्याने यावर भाष्य केलेलं नाही.“मनसेचा राजीनामा दिल्यानंतर मला अनेक पक्षातील नेत्यांचे फोन आले. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातूनही मला संपर्क केला गेला. पण सर्वच पक्षांना मी सांगितलं की, सध्यातरी मी कोणतीही राजकीय भूमिका जाहीर करणार नाही. कारण मला ज्या त्रासातून पक्ष सोडावा लागला, त्यानंतरही ते लोक शहाणे झालेले नाहीत, ते आतादेखील माझ्या कार्यकर्त्यांना रात्री-अपरात्री फोन करून धमकावत आहेत. या सर्वातून स्थिर स्थावर झाल्यानंतर दोन दिवसांनी राजकीय भूमिका जाहीर करेल.”, असे वसंत मोरे यांनी सांगितलं.मनसेमधून मला अनेकांचे फोन आले. राज साहेबांचाही फोन एका पदाधिकाऱ्याच्या मोबाइलवर आला होता, असं वसंत मोरे यांनी सांगितलं. “पण त्या पदाधिकाऱ्याला मी एवढंच सांगितलं की, मी हात जोडतो. पण साहेबांचा फोन मला देऊ नको. कारण आजवर संघटनेतील खरी परिस्थिती मी राज ठाकरे यांच्या कानावर घालत आलो होतो. त्यामुळे आता राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्याशी बोलून मी त्यांना दुखवू इच्छित नाही”, अशी भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली.संजय राऊत यांनी वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर भाष्य केलं होतं. वसंत मोरे हे रवींद्र धंगेकर यांच्याप्रमाणे चांगले कार्यकर्ते आहेत. ते स्वच्छ आहेत. त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना मोरे म्हणाले की, संजय राऊत यांचा काही दिवसांपूर्वी फोन आला होता. त्यावेळी आमची चर्चा झाली होती. तसेच काल त्यांचे वॉशिंग मशीनचे विधानही मी पाहिलं. एवढ्या मोठ्या माणसाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर प्रतिक्रिया देणं, हे माझे भाग्य समजतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button