वरळीतून प्रवेश केवळ ५ वाजेपर्यंत, कोंडीमुळे निर्णय;सागरी किनारा मार्गावर पहिल्याच दिवशी १६ हजार वाहने,
मुंबई महानगरपालिकेचा बहुप्रतिक्षित असा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल १६ हजारांहून अधिक वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा बहुप्रतिक्षित असा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल १६ हजारांहून अधिक वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला. त्यातही दुपारी तीन ते चार यावेळेत येणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त होती. मात्र संध्याकाळी उपनगरात जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वरळीतून प्रवेशमार्ग रात्री आठऐवजी संध्याकाळी पाच वाजताच बंद करण्यात आला. वरळीतील प्रवेशमार्ग रोज पाच वाजताच बंद केला जाणार आहे.धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका मंगळवारपासून सर्वसामान्यांसाठी खुली झाली. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा या मार्गाबाबत मुंबईकरांना प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे पहिल्या दिवशी किती वाहने या मार्गावरून प्रवास करणार याबाबतही उत्सुकता होती. पहिल्याच दिवशी या मार्गावरून सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत तब्बल १६ हजार ३३१ वाहनांनी प्रवास केला. यामध्ये सकाळी ११ वाजल्यानंतर वाहनांची संख्या तासागणिक वाढत गेली व दुपारी तीन ते चार या वेळेत सर्वाधिक १ हजार ९४७ वाहनांनी प्रवास केला. यावेळी मिनिटाला ३२ वाहने या मार्गावरून गेली.सागरी किनारा मार्गावर येण्यासाठी वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक आणि भुलाभाई देसाई रोड येथून प्रवेश करता येणार आहे. अमरसन्स गार्डन, भुलाभाई देसाई रोड आणि मरीन ड्राईव्ह येथे बाहेर पडण्यासाठी मार्ग आहेत. बोगद्यातून मरीन ड्राईव्ह येथे बाहेर पडणाऱ्या वाहनांची मोजणी केली. समुद्राखालील बोगदा हे या प्रकल्पाचे आकर्षण आहे. पहिल्या दिवशी आलेल्या वाहनांमध्ये हौसेखातर आलेल्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पहिल्याच दिवशी वेळेत बदल
सागरी किनारा मार्गावर सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत प्रवेश दिला जाणार होता. मात्र वरळी सी फेस परिसरातील बिंदू माधव ठाकरे चौकातील प्रवेश मार्गावर संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली. संध्याकाळी उपनगरात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यामुळे सागरी किनारा मार्गावर जाणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी वेळ दिला तर इथे वरळी डेरीपर्यंत वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरळीतील हा प्रवेशमार्ग संध्याकाळी पाच वाजता बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी काही वाहनचालकांचा हिरमोड झाला. मात्र बाकीचे दोन्ही प्रवेशमार्ग रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहणार आहेत.