मोदींच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला रोहित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…“कुटुंब सांभाळण्याची भाषा तुम्हाला शोभते का?
जो या वयात स्वत:चं कुटुंब सांभाळू शकत नाही, तो महाराष्ट्र काय सांभाळेल, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर केली होती. या टीकेनंतर आता शरद पवार गटाकडून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यात येत आहे. या टीकेला शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. एक्स या समाज माधमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही ९ नेटवर्कला मुलाखत दिली होती. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत विचारण्यात आलं असता, जो स्वत:चं कुटुंब सांभाळू शकत नाही, तो महाराष्ट्र काय सांभाळेल, अशी टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली.“राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट हा राजकीय विषय नाही. शरद पवार यांनी याला कितीही राजकीय विषय बनवायचा प्रयत्न केला, तरी महाराष्ट्रातील जनतेला हे मान्य होणार नाही. हा पूर्णपणे त्यांच्या कुटुंबाचा विषय आहे. शरद पवार यांचा वारसा काम करणाऱ्या त्यांच्या पुतण्याला मिळेल, की मुलगी म्हणून सुप्रिया सुळे यांना मिळेल, यासाठी सुरू असलेलं हे भांडण आहे. शरद पवार या वयात जर कुटुंब सांभाळू शकत नसतील, तर ते महाराष्ट्र काय सांभाळतील”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.पंतप्रधान मोदींच्या या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं असून कुटुंब सांभाळण्याची भाषा आपल्या तोंडून शोभते का? असा प्रश्न त्यांनी मोदींना विचारला आहे. लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशी मोदी यांची गत झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.“पत्रकारांना कधीही सामोरे न जाणाऱ्या मोदींना महाराष्ट्रासाठी एक स्पेशल मुलाखत करावी लागते आहे. यावरूनच त्यांनी मराठी स्वाभिमानाचा आणि शरद पवारांचा किती धसका घेतला, हे कळतं, मराठी माणूस दिल्लीला कशाप्रकारे झुकवू शकतो, याचा एक स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान आहे”, अशी प्रतिक्रियाही रोहित पवार यांनी दिली.