डोंबिवलीमध्ये पालिकेच्या स्वच्छता मुकादमाला रहिवाशाकडून बेदम मारहाण
डोंबिवली:सफाईच्या कारणावरून मोठागाव मधील एका स्थानिक रहिवाशाने शिवीगाळ करत मारहाण केली. या सफाई कामगाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार रहिवाशाविरूध्द दाखल केली आहे.प्रदेश पांडुरंग देसाईकर असे मारहाण झालेल्या सफाई कामगाराचे नाव आहे. ते डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव भागातील प्रभाग क्रमांंक ५३ मध्ये स्वच्छता मुकादम म्हणून कार्यरत आहेत. सफाई कामगारांंवर नियंत्रण ठेवणे हे त्यांचे काम आहे. मोठागाव मधील माणिक भोईर असे मारहाण करणाऱ्या रहिवाशाचे नाव आहे.पोलिसांनी सांगितले, प्रदेश देसाईकर गुरुवारी मोठागाव मधील प्रभागात सकाळच्या वेळेत सफाई कामगारांकडून स्वच्छतेचे काम करून घेत होते. यावेळी बजरंग निवास समोरील रस्त्यावर माणिक भोईर या रहिवाशाची मोटार कार आणि दुचाकी रस्त्यावर उभी होती. माणिक भोईर यांनी स्वच्छता मुकादम प्रदेश देसाईकर यांंना सांगितले, की आपल्या घरासमोर आपल्या मालकीच्या ज्या दोन गाड्या आहेत. त्या वाहनांखालील कचरा काढून तो साफ करण्याची मागणी केली.मुकादम देसाईकर यांनी ती मागणी तात्काळ मान्य केली आणि सफाई कामगारांना बोलावून तो कचरा काढून घेतो असे माणिक यांना सांगितले. या गोष्टीचा राग माणिक यांना आला. त्यांनी आपण सांगुनही कचरा का साफ केला जात नाही, असा प्रश्न प्रदेश यांना केला. अश्लील भाषेत शिवीगाळ करत प्रदेश यांना मारहाण केली. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.कल्याण, डोंबिवली शहरात धनदांंडगींची वाहने रस्त्यावर उभी असतात. त्या वाहनांंखाली सफाई पालिका कर्मचाऱ्यांनी दररोज करावी अशी अपेक्षा ठेऊन ते पालिका सफाई कामगारांंना नेहमीच दमदाटी करतात. अशा रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर पालिकेने वाहतूक विभागाच्या साहाय्याने कारवाई सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.