सातारा पोलिसांची मोठी कारवाई,कोयत्याने तरुणावर हल्ला करणाऱ्या तिघांना बेड्या
साताऱ्यात परीक्षेसाठी आलेल्या युवकाला बेदम मारहाण करून कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या तिघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.
सातारा : साताऱ्यात परीक्षेसाठी आलेल्या युवकाला बेदम मारहाण करून कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या तिघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कोयता, दुचाकी व मोबाईल असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, इरफान मुलांनी तुषार भोसले यांनी कारवाईत भाग घेतला. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी सातारा शहर पोलिसांचे अभिनंदन केले आहे.वैष्णव सुभाष ननावरे वय १९, राहणार पवारवाडी, वर्धनगड, तालुका खटाव, जय राहुल ठोंबरे वय १९, राहणार आजादपूर, तालुका कोरेगाव, शंकर जाधव वय १९, राहणार आदर्शनगर, तालुका कोरेगाव अशी संबंधित आरोपींची नावे आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून या तिघांनी जिल्हा रुग्णालय मार्गावर गाडी आडवी मारून फिर्यादीला कोयता मारून जखमी केले होते. दिनांक २४ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली होती. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल कोयता आणि मोबाईल असे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता ननावरे व त्याच्या दोन मित्रांचे फिर्यादी बरोबर बारामती येथे काही कारणावरून भांडण झाले होते. त्या रागातून फिर्यादीची बारामती येथून माहिती काढून तो साताऱ्यात परीक्षेला येणार होता. आरोपींनी नियोजन करून त्याला मारण्याचा कट रचला होता. सिव्हिल हॉस्पिटल रोडवर फिर्यादीला धारदार कोयत्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. तेथून संशयित पळून गेले.गुन्हे शाखेच्या पथकाने खटाव, कोरेगाव आणि बारामती येथे गोपनीय तपास करून संशयितांची नावे निष्पन्न करून या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली. खटाव व कोरेगाव येथून संबंधित तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.