देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
मुंबई, दि. २६: देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ७ एफएम केंद्रांचाही शुभारंभ झाला. डिजिटल इंडियामध्ये रेडिओला नवीन श्रोता वर्ग मिळाला. हवामानासंबंधी माहिती वेळेवर प्रसारित करण्यात ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील आणि महिला बचत गटांसाठी ते उपयुक्त ठरतील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी तसेच नंदूरबार, हिंगोली, वाशिम, अचलपूर, सटाणा या सात ठिकाणी एमएफ सेंटर्सचा शुभारंभ करण्यात आला.
देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९१ एफएम ट्रान्समीटरच्या लोकार्पणप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज ऑल इंडिया रेडिओच्या एफएम सेवेचा हा विस्तार ऑल इंडिया एफएम होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ऑल इंडिया रेडिओच्या या एफएम प्रसारणाचा हा शुभारंभ म्हणजे देशातील ८५ जिल्ह्यांतील २ कोटी नागरिकांना भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
माहितीचा वेळेवर प्रसार, शेतीसाठी हवामान अंदाज, किंवा महिला बचत गटांना नवीन बाजारपेठेशी जोडणे यामध्ये एफएम ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. रेडिओच्या माध्यमातून मन की बात कार्यक्रमाद्वारे स्वच्छता अभियान, बेटी बचाव, बेटी पढाव यासारख्या उपक्रमांना लोकचळवळीचे स्वरूप आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.