होम ग्राउंडवर सूर्या तळपला, ८३ धावांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर रचला हा जबरदस्त विक्रम;
मुंबई : मुंबई इंडियन्स संघाने घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंचर्स बंगळूरु संघाला पराभवाची धूळ चारली. मुंबईने आयपीएल २०२३च्या ५४व्या सामन्यात आरसीबीला ६ विकेट्सने पराभूत केले. या विजयात सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा आणि ईशान किशन यांचे मोलाचे योगदान राहिले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत गरुडझेप घेत थेट तिसरा क्रमांक पटकावला आहे. असं असलं, तरीही सूर्यानेही खास पराक्रम गाजवला आहे. सूर्यकुमार यादव याने या सामन्यात फक्त ३५ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ८३ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ६ षटकार आणि ७ चौकारांचा पाऊस पाडला. या धावा करताच सूर्यकुमार यादव याने आयपीएल कारकीर्दीत ३००० धावांचा टप्पा पार केला. या सामन्यानंतर त्याच्या आयपीएलमध्ये ३०२० धावा पूर्ण झाल्या. यासोबतच त्याने आयपीएलमध्ये १०२ षटकार पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, सूर्याने यापैकी २४१२ धावा या मुंबई संघाकडून केल्या आहेत, तर उर्वरित कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळताना त्याने ६०८ धावा केल्या आहेत.या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाला ६ विकेट्स गमावत १९९ धावाच करता आल्या. हे आव्हान मुंबई संघाने १६.३ षटकात ४ विकेट्स गमावत २०० धावा करून पार केले. यासोबतच ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयात सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक धावा करत एक खास विक्रम रचला.