क्रीडा

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाचा सलग 15 वा कसोटी विजय; पाकिस्तानचा 89 धावात खुर्दा

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा 360 धावांनी पराभव केला. पाकिस्तानचा हा ऑस्ट्रेलियामधील ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सलग 15 वा पराभव आहे. गेल्या 15 सामन्यात पाकिस्तानला साधा एक सामना देखील अनिर्णित किंवा जिंकता आलेला नाही.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 487 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानचा पहिला डाव 271 धावात गुंडाळत कांगारूंनी 216 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात 5 बाद 233 धावा करत ही आघाडी 449 धावांपर्यंत पोहचवली. पाकिस्तानला हे मोठे आव्हान झेपले नाही. त्यांचा दुसरा डाव 89 धावातच गारद झाला.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात 487 धावा ठोकल्या होत्या. आपली शेवटची कसोटी मालिका खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने 164 धावांची दीडशतकी खेळी केली. मिचेल मार्शने 90 धावा ठोकल्या होत्या. पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या अमर जमालने 6 विकेट्स घेतल्या होत्या.

याच्या प्रत्युत्तरात खेळताना पाकिस्तानने पहिल्या डावात 271 धावा केल्या. पाकिस्तानकडून इमाम उल हकने सर्वाधिक 62 धावा केल्या. तर दुसरा सलामीवीर शफिक 42 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लियॉनने सर्वाधिक 3 तर स्टार्क आणि कमिन्सने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावात 216 धावांची आघाडी घेतल्यानंतर कांगारूंनी दुसऱ्या डावात 5 बाद 233 धावा करत आपला डाव घोषित केला. दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजाने 90 तर मार्शने 63 धावा केल्या. स्मिथनेही 45 धावा करून योगदान दिले.

पाकिस्तानसमोर विजयासाठी 449 धावांचे आव्हान होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा दुसरा डाव 89 धावात संपुष्टात आला. कांगारूंकडून मिचेल स्टार आणि हेजलवूड यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर नॅथनने 2 आणि कमिन्सने 1 विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button