ठाणेपुणे

नाशिक: लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्यासह तिघे ताब्यात

त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक: आजारपणातून बरे झालेल्या कर्मचाऱ्याला वैद्यकीय रजेचे वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांच्यासह दोन आरोग्य सेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अलीकडेच जिल्हा उपनिबंधकाला ३० लाखांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

तक्रारदार आरोग्य विभागात कार्यरत आहे. वैद्यकीय रजेचे वेतन काढून देण्यासाठी संदर्भ रुग्णालयात कार्यरत जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. पाटील यांच्यासह आरोग्य सेवक संजय राव याचाही यात सहभाग होता. त्यांनी आरोग्य सेवक कैलास शिंदे यांच्यामार्फत १० हजाराची लाच स्वीकारली. यावेळी पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… परिचारिका भरतीच्या नावाने उमेदवारांकडून पैशांची मागणी, मालेगाव महापालिकेतील प्रकार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला. पोलीस निरीक्षक साधना इंगळे , अंमलदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी आणि प्रकाश डोंगरे आदींच्या पथकाने संशयितांना पकडले. जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील या गंगापूर भागातील स्टेट्स रेसिडेन्सी येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराची झडती घेण्याचे काम लगेच सुरू करण्यात आले.

हेही वाचा… ऐन उन्हाळ्यात पुन्हा जल संकट, शनिवारी शहरात पुरवठा बंद

तीन दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना ३० लाखांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. या कारवाईने नाशिक परिक्षेत्रातील लाचखोरांची संख्या १०० वर जाऊन पोहोचली. शासकीय कार्यालयातील कुठलीही कामे लक्ष्मी दर्शनाशिवाय होत नसल्याचा सामान्यांचा अनुभव आहे. यातून शासकीय कर्मचाऱ्यांची देखील सुटका होत नसल्याचे उपरोक्त कारवाईतून दिसून येते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील बड्या अधिकाऱ्यांच्या लाचखोरीवर प्रकाश पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button