विध्येच्या माहेर तसेच सांस्कृतिक शहरात महिला नाहीत सुरक्षित; 7 महिन्यातील प्रकरण आकडा बघून तुम्हाला ही बसेल धक्का ?
महिला आणि चिमुकल्या सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आज पहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलीस दप्तरी दाखल झालेल्या आकडेवारीतून समोर येत आहे.
पुणे : गेल्या काही वर्षांत महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलीस दप्तरी दाखल झालेल्या आकडेवारीतून समोर येत आहे.पुण्यात दोनच दिवसांपूर्वी स्कूल व्हॅन चालकाकडून दोन चिमुकल्या मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली. यासोबतच १२ वर्षाच्या मुलीवर वर्षभरापासून वडिलच अत्याचार करत असल्याचेही दिसून आले. तर, गुरूवारी मध्यरात्री बोपदेव घाट परिसरात मित्रासोबत फिरण्यास गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याने शहरात खळबळ उडाली. या घटनेच्या दोन दिवस आधीच मित्रासोबत घाटात गप्पा मारत बसलेल्या तरुणीला धमकावत आणि अन्य साथीदारांना बोलवून मारून टाकण्याची धमकी देऊन कारमधून अपरहरण झाले. तिचा विनयभंग करण्यात आला. यासोबतच एका महाविद्यालयातच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात उघडकीस आले होते. या सर्व घटना पुण्याला लावल्या जाणाऱ्या बिरूदावलीला छेद देत आहेत.
शहरात गेल्या ७ महिन्यात (फेब्रुवारी ते ऑगस्ट) विनयभंगाच्या आणि अत्याचाराच्या तब्बल ७१५ घटनांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. धक्कादायक म्हणजे महिन्याला सरासरी लैंगिक अत्याचाराच्या ३० ते ३५ घटनांची नोंद होत आहे. तर, विनयभंगाच्या घटना या ६० ते ६५ घटना आहेत. शहरात फेब्रुवारी ते ऑगस्टमध्ये लैंगिक अत्याचाराचे २६५ तर विनयभंगाचे ४५० गुन्हे नोंदवले गेले आहेत. शहरातील महिला अत्याचाराच्या घटना पाहता खरेच पुणे महिलांसाठी सुरक्षित राहिले आहे का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.गेल्या नऊ महिन्यात शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या तब्बल ३६० घटना घडल्या आहेत. त्यामुळे इथे खेळण्या-बागडण्याच्या वयातील मुली देखील सुरक्षित नसल्याचे वास्तव आहे. या मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. कधी घरातल्या व्यक्तींकडून त्या वासनेच्या शिकार होत आहेत तर कधी ओळखीतील व्यक्तींच्या अत्याचाराला बळी पडत आहेत. गेल्या ८ वर्षात अडीच हजार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले असल्याचे नोंदींवरून दिसून येत आहे.