मुंबई

छुप्या पद्धतीने होतेय खरेदी-विक्री; मुंबईकरांना या नशेचीही चटक, घाटकोपरमध्ये गँगचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईतील तरुणांना नशेसाठी कफ सिरपचा पुरवठा करणाऱ्यांची अमली पदार्थविरोधी पथकाने धरपकड सुरू ठेवली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५७० कोडेन फॉस्फेट कफ सिरपच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने कफ सिरपचा पुरवठा करणाऱ्या अनेकांची धरपकड केली असून तब्बल ८० लाखांच्या कफ सिरपचा साठा हस्तगत केला आहे. मुंबईमध्ये विशेषतः झोपडपट्टी भागात नशेसाठी मोठ्या प्रमाणात कफ सिरपचा वापर केला जातो. बेकायदा तस्करी करून पुरवठादार मुंबईत कफ सिरप घेऊन येतात आणि त्याची छुप्या पद्धतीने विक्री केली जाते. हे रोखण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पथके पुरवठादारांच्या हालचालींवर नजर ठेवून आहेत. घाटकोपर युनिटच्या प्रभारी पोलिस निरीक्षक लता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पालवे, नागेश चिकणे यांच्या पथकाने शिवडी-चेंबूर रोड, शिव येथून दोघांना ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्यांच्याकडे सुमारे दोन लाख ८५ हजारांचा कोडेन फॉस्फेट कफ सिरपचा साठा सापडला. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या दोघांविरुद्ध मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे. दोघांना न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हे दोघे पुरवठादार मागील सहा वर्षांपासून कोडेन कफ सिरपची परराज्यातील पुरवठादाराकडून तस्करी करून घाटकोपर, देवनार, शिवाजीनगर, गोवंडी, चेंबूर, भिवंडी, धारावी, वडाळा आणि शिव परिसरांत तस्करी व विक्री करत होते. गेल्या दोन वर्षांमध्ये घाटकोपरच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सात मोठ्या टोळ्यांचा पर्दाफाश करीत २१ कफ सिरप पुरवठादारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २००० किलोपेक्षा जास्त वजनाच्या आणि सुमारे ८० लाख किंमतीच्या कोडेन फॉस्फेट कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
कोडेन फॉस्फेट हा अंमली पदार्थमिश्रीत कफ सिरपच्या बॉटल्स या ‘कोरेक्स’ या नावाने प्रसिद्ध आहे. या सिरपच्या अतिसेवनाने मेंदूवर परिणाम होऊन रक्तदाब वाढतो. त्यामुळे अतिझोप येणे, हायपर होणे किंवा भूक न लागणे अशी लक्षणे दिसतात. या सिरपच्या सेवनाच्या अंमलाखाली मारामारी, चाकूहल्ले अशा प्रकारचे गुन्हे घडतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button