ठाणे

नजर चुकवत महिलेकडून तब्बल चार लाखांच्या दागिन्यांची चोरी

डोंबिवली : रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसलेल्या महिला प्रवाशाची नजर चुकवून सोन्याचे मंगळसूत्र ठेवलेली पर्स चोरी करणाऱ्या चोरट्या महिलेला कल्याणच्या लोहमार्ग गुन्हे अन्वेषण शाखेने मोठ्या कौशल्याने अटक करण्यात यश मिळविले आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलेला टिटवाळा येथून अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून चोरलेले सात तोळ्याचे जवळपास सव्वाचार लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र हस्तगत केले आहे.

ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर बसलेल्या एका महिलेची नजर चुकवून सोन्याचे मंगळसूत्र असलेली पर्स चोरून एक महिला पसार झाली होती. या प्रकरणी सदर प्रवासी महिलेच्या तक्रारीवरून डोंबिवलीच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांसह कल्याण लोहमार्ग गुन्हे अन्वेषण शाखा देखील या गुन्ह्याचा समांतर तपास करत होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, राजेंद्र दिवटे, जनार्दन लेकर, अजय रौंदळ, वैभव जाधव, स्मीता वसावे, महेंद्र कर्डीले, रविंद्र ठाकुर, अजित माने, अजीम इनामदार, गोरख सुरवसे, अक्षय चव्हाण या पथकाने चौकस तपास सुरू केला. पर्स उचलून एक महिला ठाकुर्ली स्टेशनबाहेर गेल्याचे फुटेजमध्ये आढळून आले. परंतु, ठाकुर्ली स्टेशनबाहेर सीसीटिव्ही कॅमेरे नसल्याने पर्स घेऊन ही महिला कुठे गेली असावी ? याचा काही केल्या थांगपत्ता लागत नव्हता. ठाकुर्ली स्टेशनवर कल्याणच्या दिशेकडून आलेल्या लोकलचे फुटेज तपासले असता सदर महिला कल्याणकडून येणाऱ्या लोकलमधून मुलासह ठाकुर्लीत उतरल्याचे दिसून आले. त्यामुळे कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेकडील प्रत्येक रेल्वे स्टेशनचे फुटेज तपासले असता प्रवासी महिलेची पर्स चोरणारी महिला टिटवाळ्यातील आल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर गुन्हे अन्वेषण शाखने टिटवाळ्यात चोरट्या महिलेचा शोध घेत असता ही महिला फुटेजमध्ये आढळून आली. गुन्हे शाखेच्या पथकाने तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने ठाकुर्ली स्टेशनवर बसलेल्या महिलेची पर्स चोरल्याची कबूली दिली. त्यानंतर तिच्याकडून सव्वाचार लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले. या आधी देखील तिने अशा पद्धतीने आणखी काही गुन्हे केले आहेत का ? याचा तपास गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button