मुंबई

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सायबर कक्षाच्या कामगिरीची दखल

भाईंदर : मिरा रोड येथे राहणाऱ्‍या एका व्यक्तीची क्रिप्टोकरन्सी खरेदीमध्ये चिनी व्यक्तीकडून तब्बल ३६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांच्या सायबर कक्षाने या प्रकरणाचा यशस्वी तपास करून फसवणूक झालेली लाखो रुपयांची रक्कम परदेशातून यशस्वीरीत्या परत मिळवली. संपूर्ण देशात अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण होते. त्यामुळे सायबर कक्षाच्या या कामगिरीची केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत काम करणाऱ्‍या आयफोरसीने दखल घेतली आहे. आता देशभरातील सायबर कक्षांना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यास पथकाला सांगण्यात आले आहे.

मिरा रोडच्या योगेश जैन यांना गेल्या वर्षी क्रिप्टोकरन्सी खरेदीबाबत माहिती देऊन मोठा नफा कमाविण्याचे परदेशातून प्रलोभन दाखविण्यात आले होते. त्यानुसार जैन यांनी ३३ लाख ६५ हजार रुपयांचे क्रिप्टोकरन्सी खरेदी करून ते परदेशातील ॲपमध्ये हस्तांतर केले होते; मात्र त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. जैन यांनी सायबर कक्षाकडे तकार दाखल केल्यानंतर एका चिनी व्यक्तीने ही फसवणूक केल्याचे पोलिसांनी समजले. त्यानंतर पोलिसांनी तब्बल तेरा महिने याप्रकरणाचा पाठपुरावा करून परदेशातून ही रक्कम परत मिळवली. अशा प्रकारे परदेशात जमा झालेली रक्कम सायबर कक्षाने परत मिळवण्याचे देशातील हे पहिलेच प्रकरण आहे.

सायबर कक्षाच्या या कामगिरीची केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटरने (आयफोरसी) दखल घेतली. सायबर गुन्ह्यांसदर्भात संशोधन व विकास करण्याचे काम ही संस्था करते व ती देशभरातील सायबर कक्षांची नोडल संस्था आहे. या संस्थेने मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या सायबर कक्षाला त्यांनी यशस्वीपणे उकल केलेल्या या प्रकरणासंदर्भात देशभरातील सायबर कक्षांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना केल्या आहे. या प्रकरणाचा तपास कसा केला, त्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली याचे सविस्तर तपशील सायबर कक्षाला द्यायचे आहेत.

आता देशभरातील सायबर कक्षांसाठी हे प्रकरण संदर्भ प्रकरण (केस स्टडी) म्हणून उपयोगात आणले जाणार आहे. हे मिरा भाईंदर वसई पोलिसांसाठी अभिमानास्पद ठरणार आहे. त्यासंदर्भात ऑनलाईन बैठक होणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकतीच दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button